Vinod Kambli Health Update: भारतीय क्रिकेट संघाचे माजी डावखुरे फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती सध्या ठिक नाही, अशी माहिती त्यांचा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच विनोद कांबळींच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. पंरतु, अजूनही त्यांची तब्येत ठिक नसल्याचे वीरेंद्र यांनी सांगितले. विनोद कांबळींना नीट चालता येत नसून बोलतानाही त्रास होत असल्याचे वीरेंद्र यांनी म्हटले.
वीरेंद्र यांनी विकी लालवाणी यांच्या शोमध्ये विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "विनोद कांबळींची प्रकृती आता स्थिर असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांना बोलताना त्रास होतोय आणि नीट चालताही येत नाही. त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागेल. ते एक चॅम्पियन आहेत, मला खात्री आहे की, ते लवकरच चालायला लागतील. तुम्ही त्यांना लवकरच मैदानावर पाहू शकाल, असा विश्वास वीरेंद्र यांनी व्यक्त केला. "विनोद कांबळींच्या संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. मेंदू आणि मूत्र चाचण्यांचे रिपोर्ट चांगले आहेत. ते सध्या चालू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देण्यात आला", अशीही माहिती त्यांनी दिली.
एकेकाळी महान फलंदाज सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस मानला जाणारा विनोद कांबळी आपल्या सुरुवातीच्या काळात एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून उदयास आला होता. परंतु, काही सवयींमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही.
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १ हजार ८४ धावा केल्या असून यात ४ शतके, ३ अर्धशतके आणि २ द्विशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २ हजार ४७७ धावा असून यात २ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.