Vinod Kambli on Sachin Tendulkar: क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि रोहित शर्माचा पुल शॉट प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेटमध्ये या तीन गोष्टींइतकीच प्रसिद्ध आहे ती म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री. गेल्या काही दिवसांपासून यांच्या मैत्रीची पुन्हा रंगली आहे. विनोद कांबळीची प्रकृती खराब असल्याचे काही व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात कांबळी आणि सचिन यांच्यातील भेटही व्हायरल झाली होती. तशातच शनिवारी विनोद कांबळीची तब्येत बिघडली आणि त्याला ठाण्यातील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्यावर उपचार सुरु असून तो बरा होत आहे. याचदरम्यान आज त्याने एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला.
"माझी तब्येत आता ठिक आहे. मी हळूहळू बरा होतोय. आमच्या कुटुंबात तीन डावखुरे क्रिकेटपटू आहेत. मी क्रिकेटपासून कधीही लांब जाणार नाही कारण मी किती शतके आणि द्विशतके ठोकली आहेत हे हे मला पक्कं लक्षात आहे. मी सचिन तेंडुलकरचे आभार मानतो. त्याचे आशीर्वाद आणि त्याचा पाठिंबा कायमच माझ्या पाठिशी आहे," असे विनोद कांबळीने एएनआयशी बोलताना सांगितले.
सचिनचे आभारी असल्याचे विनोद कांबळीने सांगितले. त्याचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत आहेत. याशिवाय प्रशिक्षक आणि गुरू रमाकांत आचरेकर सरांचे नावही घेतले आणि आमच्या मैत्रीत त्यांचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले. विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला शनिवारी रात्री पोलीस ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल केले. त्याला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल असे स्वत: विनोद कांबळीनेत सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला तीनदा रुग्णालयात जावे लागले.