एमसीए निवडणूक : विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित

सचिन, वेंगसरकर करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 09:28 PM2019-09-30T21:28:22+5:302019-09-30T21:46:49+5:30

whatsapp join usJoin us
Vijay Patil's presidency almost assured for Mumbai Cricket Association | एमसीए निवडणूक : विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित

एमसीए निवडणूक : विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) संलग्न असलेल्या सर्वात श्रीमंत संघटनापैकी एक मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीकडे भारतीय क्रिकेटचे लक्ष लागले आहे. एमसीएममध्ये वर्चस्व असलेल्या बाळ म्हादळकर गटाने माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी माघार घेतल्यानंतर अध्यक्षपदासाठी क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख आणि डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विजय पाटील यांना पाठिंबा दर्शविला. यानंतर विजय पाटील यांचे अध्यक्षपद जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
येत्या ४ आॅक्टोबरला एमसीएची निवडणूक होईल. यासाठी बाळ म्हादळकर गटाने अध्यक्षपदाचा आपला उमेदवार म्हणून संदीप पाटील यांना पाठिंबा दिल होता. मात्र पाटील यांनी परस्पर हितसंबंधाच्या अडचणीमुळे या निवडणुकीतून माघार घेतल्याने म्हादळकर गटाने विजय पाटील यांना आपला पाठिंबा दिला. एका क्रीडा वाहिनीसाठी संदीप पाटील समालोचन करत असल्याने लोढा शिफारशीनुसार संदीप पाटील यांना एकावेळी एकाच पदावर कार्यरत राहता येईल. त्यामुळे नाईलाजाने संदीप पाटील यांनी एमसीए निवडणुकीमधून माघार घेतली.
यानंतर बाळ म्हादळकर गटाने अध्यक्षपद वगळता इतर सर्व पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले असून अध्यक्षपदासाठी त्यांनी आपला पाठिंबा विजय पाटील यांना दर्शविला. यामुळे आता विजय पाटील यांची अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हादळकर गटाच्या वतीने उपाध्यक्षपदासाठी अमोला काळे लढणार असून खजिनदारपदासाठी जगदीश आचरेकर लढतील.
 

सचिन, वेंगसरकर करणार मतदान
एमसीएच्या निवडणुकीमध्ये एकूण ३९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मतदान करणार असून यामध्ये सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. अ‍ॅबी कुरविला, अजित आगरकर, अजित पै, अविष्कार साळवी, चंद्रकांत पंडित, चंद्रकांत पाटणकर, जतिन परांजपे, निलेश कुलकर्णी, पारस म्हांब्रे, प्रवीण आमरे, रमेश पोवार, साईराज बहुतुले, सलिल अंकोला, संजय बांगर, संजय मांजरेकर, सुधीर नाईक, सुरेंद्र नायक, उमेश कुलकर्णी, विनोद कांबळी आणि झहीर खान हेही यावेळी आपले मत नोंदवतील.

अर्ज भरण्याआधीच संदीप पाटील बाद
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याआधीच माजी क्रिकेटपटू संदीप पाटील बाद ठरले. परस्पर हितसंबंध मुद्याची अडचण होत असल्याने पाटील यांना या निवडणुकीतून अखेर मागे घ्यावी लागली. सध्या पाटील एका वृत्तवाहिनीसाठी क्रिकेटतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यामुळे ते जर या पदासाठी उभे राहिले तर हे परस्पर हितसंबंध जपल्यासारखेच होईल. त्यामुळेच त्यांनी स्वत:हून माघार घेतली.

यावेळी संदीप पाटील म्हणाले की, " मुंबई क्रिकेटसाठी योगदान देण्याची माझी इच्छा होती. मी नियमांचा सन्मान करतो, पण हे दुर्दैव आहे की, अशा नियमामुळे कोणताही क्रिकेटपटू पुढे येऊ शकत नाही. जर मी अध्यक्षपदावर निवडलो गेलो, तर परस्पर हितसंबंध नियमाच्या कचाट्यात अडकेल. यासाठी मी निवडणूक अधिकारी डी. एन. चौधरी यांना भेटलो. रवी सावंत आणि सीइओ सी. एस. नाईक यांच्यासह बीसीसीआय सीईओ राहुल चौधरी यांच्याशीही चर्चा केली. पण अखेरीस माघार घेण्याचाच निर्णय योग्य वाटला."

Web Title: Vijay Patil's presidency almost assured for Mumbai Cricket Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई