मुंबई क्रिकेट संघाला विजय हजारे चषक वन डे स्पर्धेत शनिवारी छत्तीसगड संघाकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईने विजयासाठी ठेवलेले 318 धावांचे लक्ष्य छत्तीसगडने 49.5 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. अमनदीप खरेने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर छत्तीसगडने अखेरच्या षटकात विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 5 बाद 317 धावा केल्या. जय बिस्ता ( 24) झटपट माघारी परतल्यानंतर आदित्य तरे आणि यशस्वी जैस्वाल यांनी 90 धावांची भागीदारी केली. तरेने 107 चेंडूंत पाच चौकार व 2 षटकार खेचून 90 धावा केल्या. जैस्वालने 62 चेंडूंत 3 चौकारांसह 44 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 46 चेंडूंत 50 धावांची खेळी केली. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. पण, सूर्यकुमार यादवने दिवस गाजवला. त्याने 31 चेंडूंत 8 चौकार व 6 षटकारांसह 81 धावांची वादळी खेळी करताना मुंबईला 317 धावांचा पल्ला गाठून दिला. शिवम दुबेने 12 चेंडूंत नाबाद 16 धावा केल्या.
प्रत्युत्तरात छत्तीसगडच्या आघाडीच्या फलंदाजाना मोठी खेळी करता आली नाही. जिवनज्योत सिंग ( 44), आशुतोष सिंग ( 35) आणि कर्णधार हरप्रीत सिंग ( 26) यांनी हातभार लावला. पण, खरेने मुंबईच्या तोंडचा घास पळवला. त्यानं 94 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 117 धावा केल्या. त्याला शशांक सिंग ( 40) आणि अजय मंडल ( 39*) यांनी तुल्यबळ साथ दिली.