Virat Kohli Delhi Ranji Trophy : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आता रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहली नुकताच दिल्ली संघात सामील झाला. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीचा शेवटचा साखळी सामना रेल्वे विरुद्ध होणार आहे. याआधी विराट कोहलीने संघातील खेळाडूंसोबत सराव सुरू केला आहे. मुंबईत संजय बांगरच्या देखरेखीखाली फलंदाजीचा सराव केल्यानंतर कोहलीने दिल्ली गाठली आणि संघासोबत सराव सत्रात सहभागी होत धमाल-मस्तीही केली.
विराटचा दिल्लीच्या खेळाडूंसोबत सराव, धमाल-मस्ती
विराट कोहलीचा मुंबईत फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये विराट टीम इंडियाचे माजी बॅटिंग कोच संजय बांगरसोबत दिसला होता. पण आता दिल्लीत त्याच्या रणजी संघात सामील झाल्यानंतर तो स्टेडियममध्ये खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसला. दिल्लीच्या खेळाडूंसोबत तो फुटबॉल खेळला. हे नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी खेळणार
रणजी करंडक स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात दिल्लीने आपला पहिला सामना २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्ध खेळला. या सामन्यात कोहली खेळणार होता, पण त्याला मानेला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर बसला. आता दिल्लीच्या शेवटच्या साखळी सामन्यात रेल्वे विरुद्ध खेळणार आहे. हा सामना ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासह विराट १३ वर्षांनंतर रणजीमध्ये पुनरागमन करणार आहे. याद्वारे कोहली आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर परतण्याचा प्रयत्न करेल.
२०१२ मध्ये शेवटचा रणजी सामना
विराटने शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये खेळला होता, ज्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो दोन्ही डावात अपयशी ठरला होता. कोहलीने पहिल्या डावात १४ धावा तर दुसऱ्या डावात त्याने ४३ धावा झाल्या.