लाहोर : पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद याने स्थानिक क्रिकेट सामन्यात हद्दच केली... 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात सीमारेषेजवळ कॅच सोडल्यानंतरही त्याने पंचांकडे रिव्ह्यू मागितला आणि त्यामुळे नेटिझन्सने त्याला चांगलेच झोडपले. पाकिस्तान चषक स्पर्धेतील फेडरल एरियाज आणि खैबर पख्तूनवा या संघांच्या सामन्या दरम्यान ही घटना घडली.
फेडरल एरियाज संघाकडून खेळणाऱ्या शहजादने सीमारेषेनजीक सोपी कॅच सोडली. पख्तूनवा संघाचा चार चेंडूंत तीन धावांची गरज असताना हा प्रकार घडला. चेंडू जमीनीवरुन उचलल्यानंतरही शहजादने रिव्ह्यू मागितला.
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नेटिझन्सने त्याला ट्रोल केले.
पख्तूनवा संघाने हा सामना दोन चेंडू आणि तीन विकेट राखून जिंकला. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज वहाब रियाजला पख्तूनवासाठी 5 बाद 52 धावा अशी कामगिरी केल्यामुळे मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्या गोलंदाजीमुळे एरियाजचा संघ 45.3 षटकांत 269 धावाच करू शकला.
अहमद शहजादने 60 चेंडूंत 56 धावा केल्या. पण, त्याला वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संभाव्य 23 खेळाडूंत स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्यासह मागील वर्ल्ड कप संघातील सदस्य रियाज आणि उमर अकमल यांनाही डच्चू देण्यात आला आहे.