Join us  

Video:अरे बापरे, मार्टिन गप्तिलनं 'ऑन कॅमेरा' चहलला शिवी दिली आणि मग...

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही विराट कोहलीच्या टीमनं बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:32 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही विराट कोहलीच्या टीमनं बाजी मारली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 133 धावांचं माफक लक्ष्य सहज पार केले. टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकताना मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र दुसरा ट्वेंटी- 20 सामना संपल्यानंतर न्यूझीलंड संघाचा सलामी फलंदाज मार्टिन गुप्तीलने भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला थेट कॅमेरासमोरचं शिवी देली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

भारताने दुसरा ट्वेंटी-20  सामना संपल्यानंतर क्रीडा पत्रकार जतीन सप्रु युजवेंद्र चहलची मुलाखत घेत होता. मात्र चहल त्याच्या बाजूला गप्पा मारत असलेल्या भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्तील यांच्याकडे माइक घेऊन गेला आणि व्हॉट्सअप बॉयज? असा सवाल विचारला. चहलच्या या प्रश्नावर कधी हिंदी न बोलणाऱ्या  मार्टिन गुप्तीलने ************ अशा शब्दात चहलला शिवी दिली. हा सर्व प्रकार थेट टिव्हीवर प्रदर्शित होत असल्याचे शेजारी उभा असलेल्या रोहित शर्माच्या लक्षात आले. यानंतर रोहितने कॅमेऱ्याच्या फ्रेमपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. पण, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी या दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रवींद्र जडेजानं किवी कर्णधार केन विलियम्सन आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांना माघारी पाठवून धक्के दिले. त्यात जसप्रीत बुमराहनं टिच्चून मारा केला. त्यामुळे किवींना 20 षटकांत 5 बाद 132 धावा करता आल्या. जडेजानं 4 षटकांत 18 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. ठाकूर, दुबे आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले.

न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 8) आणि विराट कोहली ( 11) लगेच माघारी परतले. पण, लोकेश राहुलनं तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह 86 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 33चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून 44 धावांवर माघारी परतला. लोकेश राहुल 50 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :युजवेंद्र चहलभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतरोहित शर्मान्यूझीलंड