Sayali Satghare Swing wicket, INDW vs AUSW: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील एकमेव पिंक बॉल कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या सायली सातघरेने आपल्या गोलंदाजीचे कसब दाखवून दिले. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी डावात तिने टाकलेला एक 'जादुई' चेंडू सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून त्याला 'डेलीव्हरी ऑफ द मॅच' म्हटले जात आहे.
स्विंग कळलाच नाही, फलंदाज क्लीन बोल्ड
ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर स्विंग खूप चांगला मिळतो याचा साऱ्यांनाच अंदाज आहे. त्यामुळे मुंबईची मराठमोळी सायली सातघरे हिने आपला जादुई स्विंग पर्थच्या मैदानावर आजमावून पाहिला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील तिसऱ्याच षटकात सायलीने एक भेदक इनस्विंगर चेंडू टाकला. हा चेंडू इतक्या वेगाने आत आला की फलंदाज जॉर्जिया वॉलच्या बॅट आणि पॅडच्या मधून जाऊन थेट लेग-स्टंपवर आदळला. वॉलला केवळ २ धावांवर माघारी परतावे लागले. या विकेटचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-
पदार्पणात शानदार कामगिरी
सायली सातघरे ही या सामन्यात पदार्पण करणाऱ्या चार भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. तिने पहिल्याच दिवशी १०.३ षटके टाकली आणि २४ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी घेतले. जॉर्जिया वॉलला बाद केल्यानंतर सायलीने ऑस्ट्रेलियाची आक्रमक कर्णधार एलिसा हिली हिलाही बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. सायली सातघरेच्या या चेंडूचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (cricket.com.au) आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून, त्यावर 'सायली सातघरेचा पदार्पणातील पहिल्या बळीसाठी अप्रतिम क्षण' असे कॅप्शन दिले आहे. भारतीय महिला क्रिकेटसाठी सायलीची स्विंग गोलंदाजी हा अत्यंत आश्वासक मानली जात आहे.
सामन्याची स्थिती
भारताचा पहिला डाव १९८ धावांवर आटोपल्यानंतर सायलीच्या या दोन महत्त्वाच्या बळींमुळे भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.