प्रॉव्हिडेन्स(गयाना) : भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य भारताने 7 विकेट राखून पूर्ण केलं. भारताकडून मिताली राजने 47 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. तर स्मृती मनधानाने 28 चेंडूत 26 धावा केल्या. पण, या सामन्याच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेने सर्वांची मनं जिंकली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या माणुसकी जपणाऱ्या कृतीने सर्वांची वाहवा मिळवली.
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरू असताना खेळाडूंसोबत असलेल्या एका चिमुरडीला भोवळ आली. राष्ट्रगीत संपताच हरमनप्रीतने त्या चिमुरडीला कुशीत घेतले आणि उचलून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवले. हरमनप्रीतच्या त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...
भारतीय संघाने न्यूझीलंडपाठोपाठ पाकिस्तानलाही नमवून ब गटात आपले स्थान मजबूत केले आहे. भारताचा पुढील सामना आयर्लंड संघाशी 15 नोव्हेंबरला होणार आहे.