ठळक मुद्देव्हिडिओला 50,000 हून जास्त लाईक्सभारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वलपाठीमागील सीटवर हार्दिक पांड्या
मुंबई, दि. 16 - सध्या भारतीय संघ फुल फॉर्ममध्ये आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारून व्हाइटवॉश देणा-या भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. यातच भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. तसेच, भारतीय संघातील इतर फलंदाज त्याचा डॅडी डी या नावाने उल्लेख करत आहेत.
शिखर धवन याने बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीची वेळ असून शिखर धवन ऑटो रिक्षा चालवत असल्याचे दिसत आहे. तर, त्याचासोबत पाठीमागील सीटवर हार्दिक पांड्या बसला असून मजा घेत आहे. ऑटो रिक्षात पंजाबी गाण्याचा आवाज येत आहे. दरम्यान, शिखर धवनच्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी अक्षरश: उचलून धरले आहे. इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अवघ्या दोन तासांत जवळपास या व्हिडिओला 50,000 हून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.
सध्या भारतीय संघ श्रीलंका दौ-यावर आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारून व्हाइटवॉश देणारा भारतीय संघ आता आगामी होणा-या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागला आहे.
दरम्यान, श्रीलंकेसोबत झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान शिखर धवन आपल्या शतकी खेळीनंतर जल्लोष साजरा करताना नवीन स्टाईलने साजरा केला. यावेळी त्याने तंबूत बसलेल्या भारतीय खेळांडूकडे पाहत दोन्ही हात उंचावून व्हिक्टरी साइन (V) करत पोझ दिली. याच त्याच्या व्हिक्टरी साइनला डॅडी डी नाव देण्यात आले. याचबरोबर, कसोटी सामन्यादरम्यान के. एल. राहूल आणि हार्दिक पांड्या यांनी शिखर धवन हा शतक करणार अशी भविष्यवाणी केली होती आणि ती खरीच ठरली. त्यामुळे या दोघांनी त्याला सोशल मीडियावर डॅडी-डी नावाने संबोधित केले.