Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने २० षटकांत १६२ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने केलेलं संयमी अर्धशतक आणि अभिनव मनोहरची २१ चेंडूत ३५ धावांची फटकेबाजी याच्या बळावर गुजरातला ही धावसंख्या गाठता आली. पहिल्या डावात हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरीही चर्चा मात्र अभिनव मनोहरची रंगली. हैदराबादचे फिल्डर्स गुजरातच्या अभिनव मनोहरवर मेहेरबान झाल्याचं दिसून आले. एक वेळ अशी आली की स्वत: फलंदाज अभिनव मनोहरला देखील हसू आवरले नाही.
हार्दिक पांड्या एका बाजूने संयमी खेळी खेळत असताना डेव्हिड मिलर बाद झाला. त्याच्या जागी अभिनव मनोहर फलंदाजीसाठी आला. त्याने आल्यापासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. त्यातच त्याला हैदराबादच्या खराब क्षेत्ररक्षणाची साथ लाभली. अभिनव मनोहरचे हैदराबादच्या फिल्डर्सने तब्बल तीन वेळा झेल सोडले. त्यामुळे त्याला जीवदान मिळालं आणि त्यालाही हसू अनावर झाल्याचं दिसून आले.
दरम्यान, अभिनव मनोहरने दमदार कामगिरी केली. त्याने फटकेबाजी करत शेवटच्या टप्प्यात धावफलकाला गती दिली. त्याने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याशिवाय, हार्दिक पांड्यानेही शांत व संयमी अर्धशतक ठोकलं. त्याने ४२ चेंडूत ५० धावांची खेली केली. नटराजनने ३४ धावांत २ भुवनेश्वरने ३७ धावांत २ बळी टिपले.