Join us

विदर्भ-मध्य प्रदेश, मुंबई-तामिळनाडू भिडणार; रणजी करंडक उपांत्य सामने आजपासून

विदर्भाने या मैदानावर यंदाच्या सत्रात चारपैकी तीन सामने जिंकले असून, सौराष्ट्रविरुद्ध सामना गमावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:59 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वेळेच्या विजेत्या विदर्भाला स्थानिक व्हीसीए सिव्हिल लाइन्स मैदानावर शनिवारपासून रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध दोन हात करावे लागतील. विदर्भाने या मैदानावर यंदाच्या सत्रात चारपैकी तीन सामने जिंकले असून, सौराष्ट्रविरुद्ध सामना गमावला होता. सेनादलावर ७ गड्यांनी, हरियाणावर ११५ धावांनी आणि उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकवर १२७ धावांनी विजय नोंदविला होता.

फलंदाजांचा शानदार फॉर्म ही विदर्भाच्या जमेची बाब ठरते. करुण नायर (५१५), ध्रुव शोरे (४९६) , अथर्व तायडे (४८८) आणि कर्णधार अक्षय वाडकर (४५२) या सर्वांनी धावा काढल्या. व्हीसीएची खेळपट्टीही फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते.दुसरीकडे, वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटे यांनी शानदार मारा करीत यंदा ६८ बळी  घेतले. 

२०२२ चा विजेत्या मध्य प्रदेशने यंदा आठपैकी तीन साखळी सामने जिंकले, तर अन्य सामन्यांत पहिल्या डावांत आघाडी मिळविली होती. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी आंध्रविरुद्ध अवघ्या चार धावांनी सरशी साधली. व्यंकटेश अय्यर याने सर्वाधिक ५२८, हिमांशू मंत्री ५१३ आणि यश दुबे याने ५१० धावा केल्या आहेत.  संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी संघात असलेल्या रजत पाटीदारची उणीव जाणवेल.  गोलंदाजीत कुमार कार्तिकेय याने ३८, सारांश जैन २७ आणि डावखुरा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलियाने २६ गडी बाद केले  आहेत. विदर्भाला २०१७-१८ आणि २०१८-१९ च्या सत्रात चॅम्पियन बनविणारे चंद्रकांत पंडित यंदा मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

मुंबई : खराब फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर हा तामिळनाडूविरुद्ध शनिवारपासून बीकेसी मैदानावर सुरू होत असलेल्या उपांत्य सामन्यात ४१ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईकडून खेळणार आहे. कसोटी संघाबाहेर राहिलेल्या श्रेयसने उपांत्यपूर्व लढतीकडे पाठ फिरवताच बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून वगळले. 

तामिळनाडूच्या फिरकीपुढे मुंबईची भिस्त अय्यरवर असेल. प्रतिस्पर्धी कर्णधार साई किशोरने ४७ आणि दुसरा फिरकी गोलंदाज अजित राम याने ४१ बळी घेतले आहेत. मुंबईकडून अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी योगदान दिले.  रहाणेने सहा सामन्यांत एक अर्धशतक ठोकले. 

गोलंदाजीत मोहित अवस्थीने ३२ बळी घेतले आहेत. उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा संघावर पहिल्या डावात आघाडी मिळवून मुंबई संघ अंतिम चारमध्ये दाखल झाला. युवा मुशीर खान याने नाबाद २०३, तर दहा आणि ११ व्या स्थानावरील  तनुष कोटियान-तुषार देशपांडे यांनी विक्रमी शतकी खेळी केली. तामिळनाडूने गत विजेत्या सौराष्ट्रला नमविले. मुंबईविरुद्ध एन. जगदीशन (८२१ धावा) हा किती प्रभावी ठरेल, याची उत्सुकता आहे. सुरुवातीच्या सामन्यात नाबाद २४५ आणि ३२१ धावा केल्यानंतर पुढच्या सात डावांत त्याने एकही अर्धशतक केले नाही.  बाबा इंद्रजीत  (६८६) याने लक्षवेधी कामगिरी केली, तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे गोलंदाजीला धार लाभली. मुंबईच्या आघाडीच्या फळीत पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी हे फलंदाज असून अष्टपैलूची भूमिका शार्दूल ठाकूर तसेच शम्स मुलानी बजावतील.

टॅग्स :रणजी करंडक