राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये दर तीन चेंडूंमागे एक सिक्सर मारणारा धडाडीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीला 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन' पुरस्कार मिळाला आहे. यामुळे त्याला टाटाची कर्व्ह ही कार बक्षीस मिळाली आहे. ही कार जरी वैभवला मिळाली असली तरी तो ती पुढील काही वर्षे चालवू शकणार नाहीय.
यंदाची आयपीएल वैभवने गाजवली. गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने आयपीएलमधील सर्वात जलद शतक नोंदविले. तसेच तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुणही खेळाडू ठरला आहे. त्याने सर्वात जलद शतक ठोकण्याचा युसुफ पठाणचा विक्रमही मोडला आहे.
आयपीएलच्या नियमांमुळे वैभव यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ सात सामनेच खेळू शकला. परंतू, या सात सामन्यात त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 रन काढले. यात एक शतक, एक अर्धशतक आहे. या कामगिरीमुळे त्याला टाटा कर्व्ह कार देण्यात आली आहे. वैभवचे वय १४ वर्षे आहे, यामुळे तो पुढील चार वर्षे म्हणजेच १८ वर्षांचा होईपर्यंत हा कार चालवू शकणार नाहीय.
भारतात १८ वर्षांचा झाल्यावर ड्रायव्हिंग लायसन काढता येते. यामुळे कार मिळाली तरी त्याला ती चालविण्यासाठी ४ वर्षे वाट पहावी लागणार आहे. वैभवचे आता अंडर-19 टीममध्येही सिलेक्शन झाले आहे. आयपीएलनंतर तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.