१४ वर्षीय वैभव सूर्यंवशी इंग्लंडमधील वादळी अन् विक्रमी शतकी खेळीमुळे चर्चेत आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना इंग्लंडच्या संघासमोर त्याने जलद शतकी खेळीचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. इंग्लंड दौऱ्यावरील यूथ वनडे स्पर्धेतील चौथ्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने १४३ धावांची धमाकेदार खेळी केली. जलद शतकी खेळीसह U19 मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. आता त्याच्या नजरा या द्विशतकावर आहेत. खुद्द वैभव सूर्यंवशीनं ते बोलून दाखवलंय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्ल्ड रेकॉर्ड सेट करूनही वैभव सूर्यंवशी असमाधानी, म्हणाला...
इंग्लंड दौऱ्यातील धमाकेदार खेळीनंतर BCCI नं वैभव सूर्यंवशीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवा बॅटर आपले पुढचं ध्येय काय ते सांगताना दिसून येते. वैभव म्हणाला की, मी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय ही गोष्ट टीम मॅनेजर अंकित सरांनी सांगितली. पण मला वाटते की, ही खेळी आणखी मोठी करू शकलो असतो. २० षटके शिल्लक असताना एक चुकीचा फटका खेळल्यामुळे विकेट गमावली. पुढच्या सामन्यात ५० षटकांपर्यंत मैदानात टिकून खेळत २०० धावा करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मी जितक्या धावा करेन, तितका संघाला फायदा होईल, असेही तो यावेळी म्हणाला आहे.
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील ४ सामन्यात कुटल्यात ३०० पेक्षा अधिक धावा यूथ वनडे मालिकेत वैभव सूर्यंवशीनं प्रत्येक सामन्यात आपल्या भात्यातील धमक दाखवली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील ४ सामन्यानंतर वैभव सूर्यंवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. या मालिकेत एक शतक आणि एका अर्धशतकासह त्याने ८०.५० च्या सरासरीसह ३२२ घावा कुटल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून २७ चौकार आणि २७ षटकार पाहायला मिळाले आहे. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर चौथ्या सामन्यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी खिशात घातली आहे.