Join us

IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?

Vaibhav Suryavanshi New Coach: वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:53 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi New Coach: राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधील प्रवास संपला. वैभव सूर्यवंशीचा यंदाच्या आयपीएलचा अनुभव खूपच समृद्ध करणारा होता. त्याने आपल्या धुवाँधार फलंदाजीच्या जोरावर आपला ठसा उमटवला. आता आयपीएल संपताच वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षकही बदलले आहेत. वैभव खेळत असलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनने देशांतर्गत क्रिकेटच्या नवीन हंगामासाठी नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. बिहार क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकाचे नाव विनायक सामंत आहे. आता सामंत हे बिहार क्रिकेट संघासह देशांतर्गत क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीला आणि इतर खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसणार आहेत.

'मुंबईकर' प्रशिक्षक देणार वैभवला प्रशिक्षण

विनायक सामंत स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी यष्टीरक्षक म्हणून खेळले आहेत. पण आता ते बिहार क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असतील. बिहार संघाचे प्रशिक्षक होण्यापूर्वी, विनायक सामंत यांनी २०१८ ते २०२० या दोन हंगामात मुंबईचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. २०२३-२४च्या हंगामात ते आसाम क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट अकादमीमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. २०२३-२४ मध्येच त्यांनी कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुंबई अंडर-२३ संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले. याशिवाय, विनायक सामंत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचा अनुभव आहे. बिहारचे प्रशिक्षक होण्यापूर्वी ते युरोपियन लीगमध्ये बेल्जियम क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.

वैभव सूर्यवंशीसाठी खास प्लॅनिंग काय?

स्वतः विनायक सामंत यांनी मुंबई मिररशी बोलताना बिहार क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्याची माहिती दिली. या नवीन भूमिकेबद्दल ते खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार क्रिकेटला पुढे नेण्यास आणि तेथील नव्या दमाच्या खेळाडूंसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सामंत यांनी सांगितले. वैभव सूर्यवंशीबद्दल विनायक सामंत म्हणाले की, त्याच्यात अद्भुत प्रतिभा आहे हे आयपीएलमध्ये दिसलंच आहे. वैभव अजूनही खूप लहान आहे. मला त्याच्या नैसर्गिक खेळात अडथळा आणायचा नाही. पण मी त्याला बहुदिवसीय खेळांसाठी नक्कीच मार्गदर्शन देईन. म्हणजे रेड बॉल क्रिकेटमध्ये जुळवून घेण्यासाठी त्याला मदत होईल. जेणेकरून तो रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकेल.

वैभवच्या नव्या प्रशिक्षकांना पगार किती?

बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये गेम डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्सचे संचालक असलेले आनंद यालविगी यांनी विनायक सामंत यांची बिहार क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. बिहार क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून विनायक सामंत यांच्या पगाराबाबत स्पष्टपणे उघड करण्यात आलेले नाही. पण सूत्रांनुसार, त्याचा हंगामी पगार १५ ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

टॅग्स :आयपीएल २०२४ऑफ द फिल्डराजस्थान रॉयल्सबिहार