टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड सेट केल्यावर वैभव सूर्यंवशीनं कडक सिक्सर मारत ३५ चेंडूत शतक साजरे केले. आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक आहे. याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावे होता. त्याने ३७ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. या यादीत युनिवर्सल बॉस ख्रिस गेल सर्वात आघाडीवर आहे. २०१३ च्या हंगामात त्याने बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक झळकावले होते.
गेलच्या पाठोपाठ लागतो १४ वर्षीय पोराचा नंबर
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यातीद ख्रिस गेल पाठोपाठ आता वैभव सूर्यंवशीचा नंबर लागतो. त्याने ३५ चेंडूत शतक साजरे केले. १४ वर्षाच्या या पोरानं १५ वर्षांपासून अबाधित असणारा युसूफ पठाणचा रेकॉर्ड मोडीत काढला. युसूफ पठाण याने राजस्थानकडून खेळतानाच २०१० च्या हंगामात ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
शतकी खेळीत ७ चौकारासह मारले ११ षटकार
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दोन सामन्यात त्याने ट्रेलर दाखवला होता. पण खऱ्या अर्थानं जयपूरच्या मैदानात महत्त्वाच्या मॅचमध्ये २०० धावांचा पाठलाग करताना त्याने पिक्चर रिलीज केल्याचे पाहायला मिळाले.