तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अनेक पुरुष सामन्यांमध्येही राठी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 05:30 IST2024-05-06T05:29:44+5:302024-05-06T05:30:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Use of technology is good for sports; Opinion of India's first female Test umpire | तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तंत्रज्ञानामुळे खेळ सोपा होत असून याचा खेळाला फायदा होत आहे. पंच म्हणून अनेकदा चुकीचे निर्णय सुधारले जात आहेत. खेळाला याचा फायदा होत असल्याने माझी तंत्रज्ञानाला पसंती आहे,’ असे मत भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच वृंदा राठी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. 

माटुंगा येथे १६ वर्षांखालील कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या राठी यांनी म्हटले की, ‘अनेकदा चुकीचे निर्णय दिल्यानंतर वाईट वाटतं. त्याचवेळी डीआरएसमुळे अशा निर्णयांमध्ये सुधारणा झाल्याचे समाधानही वाटतं. पंच म्हणून आम्हाला शिकण्यासही मिळते. आम्ही यानुसार अभ्यास करून कामगिरीत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. खेळासाठी हे तंत्रज्ञान खूप चांगले आहे.’ सुरुवातीला स्कोअरर म्हणून काम करणाऱ्या राठी यांनी २०१३ पासून पंच म्हणून सुरुवात केली. २०२० मध्ये आयसीसी पंच समितीमध्ये समावेश झालेल्या राठी यांनी आतापर्यंत महिला टी-२० विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, डब्ल्यूपीएल अशा अनेक स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. 

अनेक पुरुष सामन्यांमध्येही राठी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या अनुभवाबाबत त्यांनी सांगितले की, ‘पुरुष क्रिकेटपटूंना महिला पंचांचा स्वीकार करण्यात वेळ गेला. पुरुष क्रिकेटमध्ये पंचगिरी करणे आव्हानात्मक होते. सुरुवातीला खेळाडूंकडून खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अनेकदा विनाकारण फलंदाज बाद असल्याचे अपील करत आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. कधी कधी आताही असे प्रयत्न होतात. पण, आम्ही ठामपणे निर्णय देत असल्याने असे प्रकार आता कमी झाले आहेत. पुरुष क्रिकेटपटूंना महिला पंचांच्या क्षमतेची जाणीव झाल्याने आता फारशा अडचणी येत नाहीत.’ 

फक्त खेळाडू बनू नका!
क्रिकेट कारकिर्दीबाबत राठी म्हणाल्या की, ‘क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी खेळाडू बनण्याव्यतिरिक्त अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. पंच, स्कोअरर, प्रशिक्षक, मानसिक प्रशिक्षक, फिजिओ, न्यूट्रिशनिस्ट असे अनेक पर्याय आहेत. प्रत्येकजण क्रिकेटपटू म्हणून यशस्वी ठरणार नाही, तेव्हा अशा विविध मार्गातून कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न करा.’

Web Title: Use of technology is good for sports; Opinion of India's first female Test umpire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.