IPL 2025 Unsold Player, Big Record in Cricket: सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. या हंगामातील दोन आठवड्यांचा खेळ झाला आहे. काही खेळाडू अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करताना दिसत आहेत तर काही खेळाडूंनी निराश केले आहे. या हंगामासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये लिलाव झाला. IPL 2025 च्या मेगालिलावात अनेक खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात एका खेळाडूची मूळ किंमत २ कोटी रुपये होतील. पण त्याला कुणीही खरेदी केले नाही. अखेर तो 'अनसोल्ड' राहिला. तो खेळाडू म्हणजे इंग्लंडचा टॉम बँटन. IPL मध्ये त्याला कुणीही वाली सापडला नाही, पण आता मात्र त्याने एका सामन्यात खेळताना तब्बल १५० वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठोकून दाखवली आहे. जाणून घ्या त्याचा विक्रम.
टॉम बँटनने ठोकल्या ३४४ धावा
टॉम बँटनने ३८१ चेंडूंचा सामना केला आणि ५३ चौकार आणि १ षटकारासह ३४४ धावा केल्या. त्याने एकूण ४९६ मिनिटे फलंदाजी केली. ३४४ धावांवर नाबाद राहत त्याने सर्वोत्तम धावसंख्या उभारली. टॉम बँटनच्या ३४४ धावा ही सॉमरसेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.
याआधी काय होता विक्रम?
या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन लँगरचा ३४२ धावांचा विक्रम मोडला. लँगरने २००६ मध्ये सरेविरुद्ध ही धावसंख्या केली होती. त्यानंतर त्याने १९८५ मध्ये वॉरविकशायरविरुद्ध विवियन रिचर्ड्सच्या ३२२ धावांच्या विक्रमाला मागे टाकले होते. पण आता टॉम बँटनने दोघांनाही मागे टाकले आहे. जस्टिन लँगर सध्या IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
पहिल्या डावात सॉमरसेटची आघाडी
टॉम बँटनच्या खेळीच्या जोरावर सोमरसेटने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ६३७ धावा केल्या. वॉर्सेस्टरशायरविरुद्धच्या पहिल्या डावात सॉमरसेटने ४८३ धावांची आघाडी घेतली आहे. आणि त्यांच्याकडे अजूनही ४ विकेट्स शिल्लक आहेत.