नवी दिल्ली : युनिव्हर्स बॉस नावाने प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज ख्रिस गेल ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेलने याचाच प्रत्यय देणारी आज अविस्मरणीय खेळी केली आहे. रविवारी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० प्रदर्शनीय सामन्यात त्याने झंझावाती अर्धशतक ठोकले. एका प्रदर्शनीय सामन्यात एंडेव्हर हिल्सकडून खेळताना ४३ वर्षीय गेलने वेस्टर्न सबर्ब्सविरुद्ध ६५ चेंडूत ९५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान गेलने तब्बल आठ षटकारांचा पाऊस पडला. म्हणजेच त्याने आठ चेंडूमध्ये फक्त षटकारांच्या जोरावर ४८ केल्या.
दरम्यान, ख्रिस गेलने केलेल्या या ताबडतोब खेळीच्या जोरावर एंडेव्हर हिल्स संघाने ४ गडी गमावून १६७ धावा केल्या. खरं तर आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेलची ही खेळी फ्रँचायझींना आकर्षित करते की हे पाहण्याजोगे असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे गेल आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र त्याने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावातून आपले नाव मागे घेतले होते.
ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा मोठ्या कालावधीपर्यंत हिस्सा राहिला आहे. त्याने आयपीएलच्या त्याच्या कारकिर्दीत १४२ सामन्यांमध्ये ४,९६५ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने आयपीएल २०१३ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सहारा पुणे वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नाबाद १७५ धावा केल्या. यामध्ये १३ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश होतो. आयपीएलच्या इतिहासात गेल तीन फ्रँचायझींचा भाग राहिला आहे. २००९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेतले आणि त्याच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्याने १६ डावांत दोन अर्धशतकांसह ४६३ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात तो सर्वाधिक काळ राहिला. बंगळुरूच्या फ्रँचायझीने २०११ मध्ये करारबद्ध केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"