ओसबोर्न : अप्रतिम प्रतिभेचा धनी असलेला कर्णधार यश धूलच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत ९६ धावांनी पराभव करीत १९ वर्षे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ चा चॅम्पियन भारताची अंतिम फेरीत शनिवारी गाठ पडेल ती इंग्लंडविरुद्ध. धूल हा स्पर्धेच्या इतिहासात शतक ठोकणारा तिसरा भारतीय कर्णधार बनला.
धूलने ११० चेंडूंत ११०, तर उपकर्णधार शेख राशिद याने १०८ चेंडूंत ९४ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०४ धावांची भागीदारी केली. भारताने ५ बाद २९० धावा केल्यानंतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला ४१.५ षटकांत १९४ धावांत गुंडाळले. भारताकडून विकी ओस्तवालने तीन, रवी कुमार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी दोन-दोन आणि कुशाल तांबेने एक गडी बाद केला. वेगवान राजवर्धन हंगरगेकर याने टिच्चून मारा करीत केवळ २६ धावा दिल्या.
खराब कामगिरीमुळे राशिदला आले होते नैराश्य
गुंटूरचा शेख राशिद चांगला खेळाडू व्हावा यासाठी वडील शेख बलीशा यांनी बॅंकेची नोकरी सोडली. राशिदच्या सरावात ते सतत सोबत असायचे. त्याची निवड हैदराबादच्या आंध्र क्रिकेट अकादमीसाठी होताच तो येथे स्थायिक झाला. १४ आणि १६ वर्षे गटाच्या संघातून त्याला फारशी चमक दाखविता आली नव्हती, त्यामुळे तो नैराश्येत गेला. क्रिकेट सोडण्याचा विचार केला. मात्र वडिलांनी समजावताच तो पुन्हा खेळाकडे वळला. वयाच्या आठव्यावर्षी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्याला एका स्पर्धेत पुरस्कृत केले होते. आज तेच लक्ष्मण १९ वर्षे संघाचे कोच आहेत. राशिदच्या खेळावर विराट कोहलीचा मोठा प्रभाव आहे.
शतकी खेळी करणारे कर्णधार
या आधी विराट कोहली २००८, उन्मुक्त चंद २०१२ यांनी १९ वर्षे गटाच्या विश्वचषकात कर्णधार म्हणून शतके झळकाविली आहेत. आता यश धूलची यात भर पडली. विशेष म्हणजे हे तीनही फलंदाज दिल्लीचे आहेत.
‘राशिद आणि मी अखेरपर्यंत खेळू इच्छित होतो. आमची रणनीती यशस्वी झाली. स्पर्धेत शतक ठोकणारा तिसरा भारतीय कर्णधार बनणे माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. मोठे फकटे मारण्याऐवजी चिकाटीने फलंदाजी करण्याचे तंत्र आम्ही अवलंबले होते. त्यात यशस्वी झालो. आमच्यात फार चांगला ताळमेळ आहे.’
- यश धूल कर्णधार भारत