Join us  

अविश्वसनीय : ट्वेंटी-20त चोपल्या 314 धावा, प्रतिस्पर्धी संघ 10 धावांत गारद

माली महिला संघाने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नुकताच एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 5:19 PM

Open in App

मुंबई : माली महिला संघाने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नुकताच एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला होता. रवांडाविरुद्ध त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 6 धावांत माघारी परतला होता. शुक्रवारी त्यांच्यानावे आणखी एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.  युगांडा संघाने त्यांच्याविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यात 314 धावांचा पाऊस पाडला. महिला व पुरुष यांच्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. इतकेच नाही तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या माली संघाला त्यांनी अवघ्या 11.1 षटकांत 10 धावांवर माघारी पाठवले. ट्वेंटी-20 सामन्यातील हा सर्वात मोठा विजय ठरला.

यापूर्वी हा विक्रम संयुक्त अरब अमिराती संघाच्या नावावर होता. त्यांनी चीनचा संपूर्ण संघ 14 धावांत तंबूत पाठवून 189 धावांनी विजय मिळवला होता. पुरुषांच्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकाने 2007मध्ये केनियावर 172 धावांनी विजय मिळवला होता. रवांडाची राजधानी किगाली सिटीत सुरु असलेल्या किबुका ट्वेंटी-20 स्पर्धेत युगांडाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 314 धावा चोपून काढल्या. प्रोसकोव्हिया अलाकोने 71 चेंडूंत 116 धावा, तर रीटा मुसामालीने 61 चेंडूंत 106 धावा कुटल्या. 

मालीच्या गोलंदाजांनी 60 अतिरिक्त धावा दिल्या, त्यात 30 नो बॉल आणि 28 व्हाईड चेंडूंचा समावेश होता. मालीच्या ओमोऊ सोऊने 3 षटकांत 82 धावा दिल्या आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी आहे.  प्रत्युत्तरात मालीचा संपूर्ण संघ 11.1 षटकांत 10 धावांवर तंबूत परतला. मालीचे सहा फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. त्यांच्याकडून टी कोनाटेने सर्वाधिक चार धावा केल्या.  

ट्वेंटी-20 सामन्यात संपूर्ण संघ 6 धावांवर माघारी; चार चेंडूंत सामना जिंकलाक्रिकेटमध्ये धावांचे नवनवीन शिखर सर होत असताना दुसरीकडे संपूर्ण संघ 6 धावांवर माघारी जाण्याचा प्रसंग घडला आहे. रवांडा आणि माली यांच्यात खेळवण्यात आलेल्या महिलांच्या ट्वेंटी-20 सामन्यातील हा प्रसंग. मालीचा संपूर्ण संघ 6 धावांवर तंबूत परतला आणि रवांडा संघाने अवघ्या चार चेंडूंत हे लक्ष्य पार केले. माली संघाच्या सलामीवीर मॅरियम सॅमेकच्या बॅटीतून एकच धाव आली, उर्वरित नऊ फलंदाज शून्यावर बाद झाले. विशेष नऊ षटकं खेळून काढूनही माली संघाला केवळ 6 धावाच करता आल्या. त्यातील पाच धावा अतिरिक्त होत्या. कोणत्याही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सर्वात निचांक धावसंख्या ठरली. जोसीन निरांकुडीनेझाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आणि दोन निर्धाव षटकं टाकून... तिला एम बिमेनयीमाना व एम व्हुमिलिया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

टॅग्स :आयसीसी