भारतीय क्रिकेट संघ नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहे. ट्वेन्टी-२० सीरिजनं मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळवण्यात येणार आहे. ट्वे्न्टी-२० सीरिजमध्ये भारतीय संघात युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे. यात जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचाही समावेश आहे. उमरानला वनडे सीरिजमध्येही संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करुन वनडे वर्ल्डकपमध्ये दावेदारी सिद्ध करता येणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधीच उमराननं मोठं विधान केलं आहे. उमरान मलिकनं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडीत काढण्याचा दावा केला आहे. शोएब अख्तरनं २००३ सालच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १६१.३ किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता.
माझं लक्ष चांगल्या कामगिरीवर- उमरान
उमरान मलिकनं एका मुलाखतीत म्हटलं की चांगली कामगिरी करणं हेच आपलं लक्ष्य असून भाग्यवान ठरलो तर शोएबचा रेकॉर्ड देखील मोडू शकतो. भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करणं हाच सध्या डोक्यात विचार आहे असंही तो म्हणाला. "आता मी देशासाठी चांगली कामगिरी करण्यावरच लक्ष केंद्रीत केलं आहे. जर मी चांगली कामगिरी करू शकलो आणि नशीबवान ठरलो तर रेकॉर्ड ब्रेक करेन", असं उमरान म्हणाला.
"रेकॉर्ड ब्रेक करण्याबाबत मी सध्या कोणताही विचार करत नाहीय. तुम्ही सामन्यात नेमकं किती वेगानं गोलंदाजी करत आहात हे तुम्हाला ठावूक नसतं. खेळ झाल्यानंतर त्याची माहिती मिळते. खेळावेळी फक्त आणि फक्त गोलंदाजी उत्तम करण्यावरच लक्ष केंद्रीत करतो. संघासाठी जास्तीत जास्त विकेट्स घेण्यावरच भर असतो", असं उमरान म्हणाला.