Join us  

अशी कामगिरी करणारा उमेश यादव गेल्या 18 वर्षांतील पहिला वेगवान गोलंदाज 

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात उमेश यादव याने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांचे कंबरडे मोडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 2:08 PM

Open in App

हैदराबाद -  भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात उमेश यादव याने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. त्या डावात सहा विकेट टिपत उमेशने कसोटी क्रिकेटमधील आपल्या सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली. विशेष बाब म्हणजे उमेशने केलेली ही कामगिरी गेल्या 18 वर्षांमध्ये भारतात भारताच्या वेगवान गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 18 वर्षांपूर्वी 1999-2000 साली न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मोहाली कसोटीत जवागल श्रीनाथने डावात सहाहून अधिक बळी टिपले होते. त्यानंतर भारताच्या कुठल्याही वेगवान गोलंदाजाला अशी कामगिरी गेल्या 18 वर्षांत करता आली नव्हती. मात्र हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात उमेश यादवने भेदक गोलंदाजी करून 88 धावांत 6 बळी टिपले. भारताच्या वेगवान गोलंदाजाने घरच्या मैदानांवर 6 बळी टिपण्याची गेल्या सहा वर्षांतील ही केवळ सहावी वेळ ठरली. यापूर्वी जवागल श्रीनाथने तीन वेळा, तर व्यंकटेश प्रसादने दोन वेळा डावात सहा बळी टिपण्याची किमया केली होती.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ