पाकिस्तान संघाला सलग दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेकडून हार मानावी लागली. लंकेच्या 6 बाद 182 धावांचा पाठलाग करताना पाकचा संपूर्ण संघ 147 धावांत तंबूत परतला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या उमर अकमलने लाजीरवाणा विक्रम नावावर नोंदवला. तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या अकमलच्या अपयशी कामगिरीमुळे नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत. त्यानं श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशाच्या लाजीरवाण्या विक्रमाशी बरोबरी केली.
अकमल पाकिस्तानकडून सप्टेंबर 2016मध्ये अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता आणि त्यानंतर त्याला 2019मध्ये संधी मिळाली. पण, त्याला लंकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडताच माघारी परतावे लागले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 वेळा शून्यावर बाद होणाच्या विक्रमाशी अकमलने बरोबरी केली आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 182 धावा केल्या. भानुका राजपक्षानं 48 चेडूंत 4 चौकार व 6 षटकार खेचून 77 धावा केल्या. त्याला शेहान जयसुर्या ( 34) आणि दनुष शनाका ( 27*) यांची दमदार साथ लाभली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19 षटकांत 147 धावांत माघारी परतला. इमाद वासीम ( 47) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. लंकेच्या नुवान प्रदीपने 25 धावांत 4 विकेट्स घेतल्या.वनिंदू हसरंगा ( 3/38) आणि इसुरू उदाना ( 2/38) यांनीही योगदान दिले.