Join us  

टीम इंडियाचा डबल धमाका, एकाच वेळी नमवलं दोन प्रतिस्पर्ध्यांना

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला नमवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 9:26 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करताना टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेले 287 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 7 विकेट्स व 15 चेंडू राखून सहज पार केले. रोहित शर्माचं खणखणीत शतक आणि विराट कोहली व श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजी जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकला. पण, रविवारी टीम इंडियानं एक नव्हे तर दोन प्रतिस्पर्धांनी नमवण्याचा पराक्रम केला. आज भारताचा युवा संघानेही 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या भारतानं सलामीच्या लढतीत रविवारी श्रीलंकेवर 90 धावांनी विजय मिळवला. 

भारताच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना युवा संघानं 298 धावांचं लक्ष्य उभं केलं. यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं मोठा पल्ला गाठला. सिद्धेश वीरनं तुफान फटकेबाजी केली.  19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियानं उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईकर यशस्वी जैस्वालनं अर्धशतकी खेळी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. यशस्वीनं 74 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या. यशस्वी आणि दिव्यांश सक्सेना यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. दिव्यांश 27 चेंडूंत 3 चौकार लगावताना 23 धावांवर माघारी परतला. 

त्यानंतर कर्णधार प्रियंक गर्ग आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेसाठी अर्धशतकी भागीदारी केली. तिलक वर्मा 53 चेंडूंत 3 चौकार लगावताना 46 धावांवर माघारी परतला. गर्गनेही अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या धावसंख्येत हातभार लावला. 72 चेंडूंत 56 धावा करून गर्ग बाद झाला. ध्रुव जुरेल आणि सिद्धेश वीर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचार करून दिली. ध्रुवनं अर्धशतक झळकावलं.  सिद्धेशनं 27 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 44 धावा चोपल्या. ध्रुवही 48 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 52 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियानं 4 बाद 297 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला चौथ्या षटकात टीम इंडियानं धक्का दिला. सुशांत मिश्रानं लंकेचा सलामीवीर नवोद परणविथानाला ( 6) माघारी पाठवले. पण, त्यानंतर कमिल मिसारा आणि रवींदू रसंथा यांनी लंकेचा डाव सावरताना 87 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या यशस्वीनं ही भागीदारी तोडली. त्यानं रसंथाला 49 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर सिद्धेश वीरनं मिसाराला 39 धावांवर त्रिफळाचीत केले. कार्तिक त्यागीनं श्रीलंकेला चौथा धक्का दिला. त्यानं थवीशा कहादुवाराछीला बाद केले. लंकेचा कर्णधार निपुण परेरानं 50 धावा करताना खिंड लढवली. पण, भारतीय गोलंदाजांसमोर लंकंन संघाला तग धरता आला नाही. भारताच्या आकाश सिंग, सिद्धेश वीर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत लंकेचा डाव 45.2 षटकांत 207 धावांवर गुंडाळला. 

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया