U19 World Cup Final, India vs England Live Updates : भारताच्या युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. भारतानं पाचव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला. राज बावा ( Raj Bawa) आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच विकेट्स व ३५ धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. निशांत सिंधूने ( Nishant Sindhu) नाबाद ५० धावा करून भारताचा विजय पक्का केला. भारताने २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली प्रथम १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर २००८ ( विराट कोहली), २०१२ ( उन्मुक्त चंद) आणि २०१८ ( पृथ्वी शॉ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.
भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा ( Raj Bawa) आणि रवी कुमार ( Ravi Kumar) या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या. राज बावाने ९.५ षटकांत ३१ धावांत ५, तर रवी कुमारने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रवी कुमारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर राज बावाने मधल्या फळीला नेस्तानाबुत करताना चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा सेट फलंदाज जेम्स रेवला माघारी पाठवले आणि राज बावाने अखेरची विकेट घेत इतिहास रचला.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही. ६ बाद ६१ अशा अवस्थेतून जेम्सने इंग्लंडचा डाव सावरताना ८ व्या विकेटसाठी जेम्स सेल्ससह ( James Sales ) ९३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ११६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावा करणारा जेम्स रेवचा अफलातून झेल कौशल तांबेने टिपला. सेल्स ३४ धावांवर नाबाद राहिला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ५ विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला. २००६ मध्ये अन्वर अलीने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. राज बावाने आज ३१ धावांत निम्मा संघ बाद करून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी ( ० ) पहिल्याच षटकात बाद झाला. हर्नूर सिंग ( २१) व शेख राशिद यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून डाव सारवला. त्यानंतर शेख व कर्णधार यश धुल यांचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. पण, यावेळेस धुलला ( १७) मोठी खेळी साकारता आली नाही. शेखही ८४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. सामन्याला कलाटणी मिळाली असे वाटत असताना राज बावा व निशांत सिंधू यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला विजयासमीप पोहोचवले. गोलंदाजीत पाच विकेट्स घेणाऱ्या बावाने ३५ धावा केल्या. निशांतने नंतर फटकेबाजी केली, परंतु विजयासाठी १४ धावांची गरज असताना कौशल तांबेची ( १) विकेट पडली. निशांतने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावून भारताचा विजय पक्का केला. भारतानं ४७.४ षटकांत ६ बाद १९५ धावा केल्या.