मुंबई - श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने विक्रमांचे इमले रचताना श्रीलंकेविरूद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनकडून या मालिकेत सर्वाधिक अपेक्षा होत्या, परंतु त्याने निराश केले. मात्र, दुसरीकडे भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजीत विक्रम केले. त्यामुळे एकापेक्षा एक 'एकलव्यां'पुढे सचिनचा अर्जुन अपयशी ठरल्याचे चित्र दिसले.
या मालिकेत चमकलेल्या खेळाडूंना सरावासाठी अर्जुन एवढ्या सुविधाही मिळत नाहीत. तरीही त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना आकर्षित केले. अष्टपैलू असलेला अर्जुन नेटमध्ये दिग्गज खेळाडूंसोबत सराव करतो. त्यामुळे या अनुभवातून मालिकेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण कारकिर्दीत पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणा-या अर्जुनने सर्वांना निराश केले.
दोन कसोटी सामन्यांत श्रीलंकेचा संघ चारही डावात माघारी परतला, परंतु या 40 विकेट्समध्ये अर्जुनला केवळ तीन बळी टिपता आले. जलदगती गोलंदाज अर्जुनला पहिल्या कसोटीत दोन, तर दुस-या कसोटीत एकच विकेट मिळाली. फलंदाजीतही त्याला पहिल्या कसोटीत भोपळाही फोडता आला नाही आणि दुस-या कसोटीत त्याने 14 धावा केल्या.
अन्य गोलंदाजांमध्ये आयुष बदोणीने 10 आणि मोहित जांगराने 11 विकेट्स घेतल्या. आयुषने अष्टपैलू म्हणून या मालिकेत आपली छाप सोडली. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 185 धावा केल्या. त्याशिवाय अथर्व तायडे आणि पवन शाह या महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही जबरदस्त खेळ केला. पवनने दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात 282 धावांची विक्रमी खेळी केली. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी भारताच्या तन्यम श्रीवास्तवच्या (220) नावावर हा विक्रम होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पवनने दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पीइकच्या (नाबाद304) नावावर सर्वाधिक धावा आहेत.