१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : युवा भारताचा न्यूझीलंडवर विजय, मुशीरची अष्टपैलू कामगिरी

U-19 World Cup: मुशीर खान याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात   न्यूझीलंडवर २१४ धावांनी शानदार विजय मिळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:03 AM2024-01-31T06:03:06+5:302024-01-31T06:04:08+5:30

whatsapp join usJoin us
U-19 World Cup: India win over New Zealand, Musheer's all-round performance | १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : युवा भारताचा न्यूझीलंडवर विजय, मुशीरची अष्टपैलू कामगिरी

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : युवा भारताचा न्यूझीलंडवर विजय, मुशीरची अष्टपैलू कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्लोमफाॅन्टेन : मुशीर खान याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात   न्यूझीलंडवर २१४ धावांनी शानदार विजय मिळवला. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २९५ धावा केल्या. न्यूझीलंडला २८.१ षटकांत सर्वबाद ८१ धावांवर रोखत भारताने मोठ्या विजयाची नोंद केली. 

मुशीर खान सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.  भारताच्या सौम्य पांडे (४-१९), राज लिंबानी (२-१७) आणि मुशीर खान (२-१०) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. तत्पूर्वी, भारताकडून मुशीर खानने १२६ चेंडूंत १३ चौकार व तीन षटकारांसह १३१ धावा केल्या.  

संक्षिप्त धावफलक 
 भारत : ५० षटकांत ८ बाद २९५ धावा (मुशीर खान १३१, आदर्श सिंग ५२, उदय सहारण ३४) गोलंदाजी : मेसन क्लार्क (४-६२), रायन त्सोर्गस (१-२८).
 न्यूझीलंड : २८.१ षटकांत सर्वबाद ८१ धावा (ऑस्कर जॅक्सन १९, झॅक कमिंग १६) गोलंदाजी : सौम्य पांडे ४-१९, मुशीर खान २-१०, राज लिंबानी २-१७.

छोटे मियाँ सुभान अल्लाह, खान बंधूंनी उघडली धावांची टांकसाळ
मुंबईचे नौशाद खान यांच्या घरी मागील आठवडाभरापासून आनंदाचे वातावरण आहे. कारण मोठा मुलगा सरफराज खान याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर आता लहान मुलगा मुशीरही  १९ वर्षांखालील विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करतो आहे. काल झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मुशीर खानने स्पर्धेतील दुसरे शतके साजरे केले. १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये मुंबईच्या या १८ वर्षीय फलंदाजाने शतक झळकावले. त्यामुळे अशी कामगिरी करणारा शिखर धवननंतरचा मुशीर हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात मुशीरने ४ डावांमध्ये ८१.२५च्या सरासरीने सर्वाधिक ३२५ धावा केल्या आहेत. दरम्यान, मुशीरच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या एक दिवस आधी त्याचा मोठा भाऊ सरफराज खानचा पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 

 दोन्ही भावांना घडविणारा बाप गहिवरला
दोन्ही भावांची गरुडझेप बघून वडील नौशाद खान भावुक झाले होते. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटचे बाळकडू दिले. इतक्या वर्षांच्या अखंड मेहनतीची आणि अथक परिश्रमाची मिळालेली फलश्रुती बघून नौशाद खान म्हणाले, “मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. विशेषत: मुंबई क्रिकेट असोसिएशन, नॅशनल क्रिकेट अकॅडमी  बीसीसीआय यांचे आभार. मला आशा आहे की तो देशासाठी चांगला खेळेल. मुशीरचाही सार्थ अभिमान आहे. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून तोसुद्धा सातत्यपूर्ण कामगिरी करेल याची शाश्वती आहे.

Web Title: U-19 World Cup: India win over New Zealand, Musheer's all-round performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.