Join us  

U-19 World Cup 2022 : सहा प्रमुख खेळाडूंना झाला कोरोना, राखीव खेळाडूंसह खेळली टीम इंडिया; तरीही दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक

U-19 World Cup 2022 : India U19 have qualified for the Quarter-final : आयर्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी भारताच्या सहा प्रमुख खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाला राखीव फळी घेऊन मैदानावर उतरावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:18 AM

Open in App

U-19 World Cup 2022 : India U19 have qualified for the Quarter-final : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला बुधवारी मोठा धक्का बसला. आयर्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी भारताच्या सहा प्रमुख खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाला राखीव फळी घेऊन मैदानावर उतरावे लागले. कोरोनामुळे आयसीसीनं १७ सदस्यीय संघाला मान्यता दिलेली असल्यानं भारताला ११ सदस्य मैदानावर उतरवता आले. पण, संघ व्यवस्थापनातील सदस्यांना खेळाडूंसाठी पाणी घेऊन यावं लागलं. याही परिस्थितीत भारतीय संघानं दमदार खेळ करताना आयर्लंडवर १७४ धावांनी दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.

कर्णधार यश धुल आणि उप कर्णधार एसके राशीद यांच्यासह भारतीय संघातील ६ खेळाडूंना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला  आणि या सर्वांना विलगिकरणात जावे लागले. धुल आणि राशीद यांच्या व्यतिरिक्त मानव परख, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि वासू वत्स यांना विलगिकरणात जावे लागले होते.  आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अंग्रीश रघुवंशी व हरुन सिंग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. रघुवंशी ७० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७९ धावांवर बाद झाला. हरुनही १०१ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीनं ८८ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर राज बावा ( ४२), कर्णधार निशांत सिंधू ( ३६) आणि राजवर्धन हंगार्गेकर ( ३९*) यांनी सुरेख खेळ करताना ५ बाद ३०५ धावांचा डोंगर उभा केला.

भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ ३९ षटकांत १३३ धावांवर माघारी पाठवला. गर्व सांगवान ( २-२३), अनीश्वर गौतम ( २-११) आणि कौशल तांबे ( २-११) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. विकी ओत्सवाल, रवी कुमार आणि राजवर्धन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघआयर्लंडकोरोना वायरस बातम्या
Open in App