नवी दिल्ली : टी-२० क्रिकेट चांगल्या स्थितीत असून त्यात विशेष बदल करण्याची गरज नाही, पण एका षटकात दोन बाऊन्सरची परवानगी द्यायला हवी, असे भारताचे दिग्गज महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या मत आहे. क्रिकेटच्या या लहान स्वरूपात फलंदाजांचे वर्चस्व आहे आणि पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांना करण्यासाठी विशेष काही नसते.
गोलंदाजांवरील दबाव कमी करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे का, याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, ‘टी-२० क्रिकेट चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही. हे फलंदाजाच्या हिताचे क्रिकेट आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाज प्रत्येक षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी मिळायला हवी आणि सीमारेषा थोडी मोठी हवी.’
गावसकर पुढे म्हणाले, ‘पहिल्या तीन षटकांत बळी घेणाऱ्या गोलंदाजाला एक अतिरिक्त षटक टाकण्याची परवानगी मिळायला हवी, पण या प्रकारात कुठला बदल करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही.’
‘टीव्ही पंचाला गोलंदाज ज्यावेळी चेंडू टाकतो त्यावेळी गोलंदाजी एंडला असलेला फलंदाज क्रीजच्या बराच बाहेर उभा तर नाही ना, याची शहानिशा करण्याचा अधिकार मिळायला हवा. असे असेल तर गोलंदाजाला त्या फलंदाजाला चेंडू टाकण्यापूर्वी धावबाद करता येईल. चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज फार जास्त समोर आलेला आहे, असे जर टीव्ही पंचाला निदर्शनास आले तर पंच चौकार लगावल्यानंतर दंड म्हणून एका धावेची कपात करू शकेल, असा नियम असायला हवा, असेही गावसकर म्हणाले. ‘टीव्ही पंच जर नोबॉल बघत असेल तर नॉन स्ट्राईकर फलंदाज क्रीजच्या बाहेर आहे किंवा नाही हेसुद्धा बघू शकतो.