नवी दिल्ली : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यातील वन डे आणि कसोटी मालिकेत पराभव पत्करून मायदेशी परतला. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक असली तरी काही खेळाडू वैयक्तिक कामगिरीमुळे आनंदी आहेत. कसोटी मालिकेत भारतीय संघ दुसऱ्या व चौथ्या कसोटीत विजयासमीप आला होता. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला मालिका १-४ अशी गमवावी लागली.
तरीही सलामीवीर
लोकेश राहुलने भारतीय संघाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचे ट्विट केले. त्याने लिहिले की," इंग्लंडमधील कामगिरी समाधानकारक झाली. हा दौरा दीर्घ आणि आव्हानात्मक होता. यात बरेच चढउतार अनुभवले." या मॅसेजवर नेटिझन्सने संघाच्या कामगिरीचा पाढा वाचून दाखवत त्याला स्मृती काढा पाजला.
लोकेश राहुलने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात खणखणीत शतक झळकावले. त्याव्यतिरिक्त मालिकेतील त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली. त्याला १० डावांत केवळ २९९ धावा करता आल्या. त्यात अखेरच्या कसोटीतील १४९ धावांचा समावेश आहे. या मालिकेत पाचही सामने खेळणारा तो एकमेव सलामीवीर आहे. पहिल्या कसोटीत तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आलेला.