कोलंबो - श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करीत बांगलादेशने लंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. मुशफिकूर रहीम आणि लिट्टन दास यांच्या तुफानी खेळाच्या जोरावर बांगलादेशने हा विजय साकारला.
कोलंबोत झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करीत संघाला २१४ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाने अजिबात दडपण न घेता फटकेबाजी केली. सलामीवीर तमीम इक्बाल (४७) आणि लिट्टन दास यांनी पहिल्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली.
लिट्टन दास याने २१६ च्या स्ट्राईक रेटने २ चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करीत १९ चेंडूंतच ४३ धावा तडकावल्या. दास बाद झाल्यावर इक्बाल आणि
सौम्या सरकार यांनी काही वेळ फटकेबाजीला आवर घातला. सरकारनंतर आलेल्या मुशफिकूर रहीम याने ३५ चेंडूंतच नाबाद ७२ धावा केल्या. त्याने चार षटकार आणि
पाच चौकार लगावले. १८ व्या
षटकात महमुदुल्लाह आणि १९ व्या षटकात शब्बीर रहमान बाद झाल्यानंतर पारडे श्रीलंकेच्या बाजूने फिरेल, असे चित्र होते. मात्र रहीम याने दोन चेंडू शिल्लक राखत संघाला विजय साकारून दिला. दास आणि रहीम यांनी लंकेच्या गोलंदाजीची पिसे काढली.
तत्पूर्वी धनुष्का गुणतिलका (२६) आणि कुसाल मेंडिस (२७ चेंडूंतच ५६ धावा), उपुल थरंगाने १५ चेंडूंत ३२ धावांची खेळी करीत परेराला चांगली साथ दिली. या दोघांनी आपल्या संघाला द्विशतकी आकडा गाठून दिला. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह याने दोन षटकांत १५ धावा देत दोन गडी बाद केले. तो सर्वात फायदेशीर गोलंदाज ठरला.
तस्कीन अहमद याने ३ षटकांतच ४० धावा दिल्या. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. मुस्तफिजूर रहमान यानेदेखील ४ षटकांत ४८ धावा दिल्या. गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाºया रुबेल हुसेनच्या गोलंदाजीची लंकन फलंदाजांनी पिसे काढली. रुबेलने ४ षटकांत ४५ धावा दिल्या तरी त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ६ बाद २१४
धनुष्का गुणतिलका गो. मुस्तफिजूर रहमान २६, कुसाल मेंडिस गो. शब्बीर रहमान ५७, कुसाल परेरा झे. मुशफिकूर रहीम गो. मुस्तफिजूर रहमान ७४, दासून शनाका झे. शब्बीर रहमान गो. महमुदुल्लाह ०, दिनेश चंडीमल गो. शब्बीर रहमान गो. तस्कीन अहमद २, उपुल थरंगा नाबाद ३२, थिसारा परेरा झे. नजमुल इस्लाम गो. मुस्तफिजूर रहमान ०, जीवन मेंडिस नाबाद ६. अवांतर : १७.
गोलंदाजी - तस्कीन अहमद ३ -०-४०-१, मुस्तफिजूर रहमान ४-०-४८-३, रुबेल हुसेन ४-०-४५-०, मेहंदी हसन मिराज ४-०-३१-०, नजमुल इस्लाम २-०-२०-०, सौम्या सरकार १-०-११-०, महमुदुल्लाह २-०-१५-२.
बांगलादेश १९.४ षटकांत २१५ धावा : तमिम इक्बाल झे. गो. परेरा ४७, लिट्टन दास पायचित फर्नांडो ४३, सौम्या सरकार झे. गो. फर्नांडो २४, मुशफिकूर रहीम नाबाद ७२, महमुदुल्लाह झे. मेंडिस गो. चमिरा २०, शब्बीर रहमान धावबाद परेरा ०, मेहंदी हसन मिराज नाबाद ०. अवांतर : ९. गोलंदाजी : दुश्मंथा चमिरा ४-०-४४-१, अकिला धनंजया ३-०-३६-०, नुवान प्रदीप फर्नांडो ४-०-३७-२, धनुष्का गुणतिलका २-०-२२-०, थिसारा परेरा ३.४-०-३६-१, जीवन मेंडिस २-०-२५-०, दासून शनाका १-०-१२-०.