लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे ट्रेनर लॉकडाऊनमध्येदेखील आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर तीक्ष्ण नजर ठेवून आहेत. संघातील खेळाडूंना फिटनेसचा चार्ट दिला आहे आणि ट्रेनर निक वेब तसेच फिजियो नितीन पटेल ‘अॅथ्लिट्स मॉनिटरिंग सिस्टीम’ या अॅपद्वारे खेळाडूंच्या फिटनेसवर बारीक नजर ठेवून आहेत.
संघ व्यवस्थापनाशी संबंधित सूत्राने सांगितले की, करारबद्ध खेळाडूंच्या प्रगतीबरोबरच ज्या विभागात सुधारणांची आवश्यकता आहे, त्यावर निक आणि नितीन लक्ष देत आहेत. खेळाडूंचा डाटा अॅपवर आल्यानंतर निक आणि नितीन ते तपासतात आणि प्रत्येक दिवशी ते खेळाडूंची प्रगती तपासत आहेत.
एका माजी खेळाडूने लॉकडाऊन म्हणजे फिटनेसकडे दुर्लक्ष करून गोड आहार घेणे, असा होत नाही, हे स्पष्ट केले.
सूत्राने सांगितले की, हे खेळाडू खूप व्यावसायिक आहेत. संघाचा कर्णधार विराट कोहलीने जे मापदंड निर्माण केले आहेत, त्यानुसार फक्त एकदाच तुम्ही आवडता आहार घेऊ शकता; परंतु तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. एएमएस अॅपद्वारे केव्हा किती कॅलरी खाऊ शकता आणि केव्हा त्यांना दूर ठेवू शकता, हे समजू शकते. खेळाडूंना कशा प्रकारे व्यायाम करण्यास सांगितले आहे, हे विचारले असता सूत्राने सांगितले की, रुटीन हे खेळाडूंना लक्षात घेऊनच बनविण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)
पीसीबी घेणार खेळाडूंची आॅनलाईन फिटनेस टेस्ट
कराची : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंंची पीसबीकडून आॅनलाईन फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. यादरम्यान त्यांना यो-यो टेस्टदेखील उत्तीर्ण करावी लागेल.
पीसीबीने करारबद्ध खेळाडंूना फिट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, फिटनेस टेस्ट २० आणि २१ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनामुळे पाकिस्तानात १५ मार्चपासून क्रिकेट ठप्प असून, खेळाडूंच्या फिटनेसची चिंता पीसीबीला भेडसावत आहे. पाकिस्तानचे मुख्य कोच आणि मुख्य निवडकर्ते मिस्बाह उल हक तसेच संघाचे ट्रेनर यासिर मलिक यांनी सर्व खेळाडूंना फिटनेस टेस्टची माहिती दिली. अनेक बंधने असताना तसेच मर्यादित साधनांमध्ये आम्ही फिटनेसची नवी योजना आखली. सर्वांना यात संधी दिली जाईल. खेळाडूंनी स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवावे. सर्व फिटनेस ट्रेनरकडून व्हिडिओलिंकद्वारे होतील, असे पीसीबीने पत्रात म्हटले आहे. फिटनेस उत्तीर्ण करण्यासाठी खेळाडूंनी शिस्तीत वागणे आणि कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. करारबद्ध खेळाडू हे राष्टÑीय संघाच्या मुख्य ट्रेनरच्या देखरेखीखाली तसेच अन्य प्रांतातील खेळाडू आपापल्या राज्यातील ट्रेनरपुढे फिटनेस सिद्ध करतील. परीक्षणात एका मिनिटात ६० पुशअप, एका मिनिटात ५० सिटअप, एका मिनिटात दहावेळा चिनअप यासह लेव्हल १८ अंतर्गत यो-यो टेस्टचा समावेश असणार आहे. (वृत्तसंस्था)