सध्या बांगलादेशमध्ये ढाका प्रीमिअर डिव्हिजन क्रिकेट लीग सुरू आहे. या लीगदरम्यान बांग्लादेश क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीबीने मोठी कारवाई केली आहे. बीसीबीने स्टार खेळाडू तौहीद हृदोयवर चार सामन्यांची बंदी घातली आहे. तौहीदने एका सामन्यात भरमैदानात पंचाशी वाद घातला. त्यानंतर बीसीबीने हा निर्णय घेतला. या लीगमध्ये तौहीद मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचे नेतृत्व करत आहे. त्याने १२ एप्रिल रोजी पंचाशी वाद घातला होता. त्यानंतर २६ एप्रिलला गाजी ग्रुप क्रिकेटर्सविरुद्ध सामन्यातही तौहीद बाद झाल्यानंतर त्याने पंचांनी दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तौहीद हृदोय बीसीबीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला.
नेमकं काय घडलं?पंचांनी बाद दिल्यानंतर तौहीद क्रिजवरच थांबला आणि त्याने मैदान सोडण्यास नकार दिला. पंचाच्या निर्णयाला विरोध करणे डीपीएल आचारसंहितेच्या अनुच्छेद २.८ नियमाचे उल्लंघ आहे. हा एक गुन्हा असून त्याअंर्तगत तौहीदविरोधात कारवाई करण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'सामन्यादरम्यान तौहीदने पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याचा आरोप मैदानातील पंच मोनिरुज्जमां टिंकू आणि अली अरमान राजोन आणि तिसरे पंच मुहम्मद कमरुज्जमां आणि चौथे पंच एटीएम एकराम यांनी केला. त्यानंतर तौहीदवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्ध शतकफेब्रुवारी महिन्यात खेळण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तौहीदने भारताविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने ११८ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती, ज्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मात्र, हा सामना भारताने जिंकला होता.