Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियामध्ये प्रत्येक जागेसाठी कडवी स्पर्धा

मंगळवारी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली. शिवाय आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यांची मालिका, तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीही संघ निवड झाली. त्याचबरोबर भारतीय ‘अ’ संघाचीही या वेळी घोषणा करण्यात आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:59 IST

Open in App

- अयाझ मेमनसंपादकीय सल्लागारमंगळवारी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली. शिवाय आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यांची मालिका, तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीही संघ निवड झाली. त्याचबरोबर भारतीय ‘अ’ संघाचीही या वेळी घोषणा करण्यात आली. एकूण २८ खेळाडूंचा या तीन संघांमध्ये समावेश आहे. तसेच भारत ‘अ’ संघात एकूण २४ खेळाडू आहेत. म्हणजेच एकूण ५२ खेळाडूंची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिले म्हणजे आपल्याकडे खूप गुणवत्ता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संघातील प्रत्येक जागेसाठी कडवी स्पर्धा आहे. दिग्गज खेळाडूही संघातील आपली जागा निश्चित धरू शकत नाही. माझ्या मते केवळ विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांचेच तिन्ही प्रकारच्या संघातील स्थान निश्चित आहे. दरम्यान, लोकेश राहुल, उमेश यादव, हार्दिक पांड्या, शिखर धवन यांसारखे खेळाडू तिन्ही संघांत येतात. पण जेव्हा अंतिम ११ खेळाडूंचा प्रश्न असतो तेव्हा कोहली व भुवी यांचे स्थान नक्की मानले जाऊ शकते. सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी हे दोन्ही खेळाडू खेळणार नाहीत. कोहली इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळणार असून भुवीला जसप्रीत बुमराहसह विश्रांती देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.सर्वांत मोठी बातमी म्हणजे भारताच्या तिन्ही संघांत स्थान असलेल्या स्टार रोहित शर्माला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे तुलनेत दुबळा असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध लढत असूनही त्याला संघात स्थान मिळालेले नाही हे लक्षात घ्यावे लागेल. फॉर्म चांगला नसल्याने त्याच्याऐवजी करुण नायरला संधी मिळाली आहे. दुसरीकडे एकदिवसीय आणि टी२० संघाचा विचार करता अजिंक्य रहाणेने आपली जागा गमावली आहे. त्यामुळे हे दोन्ही वृत्त धक्कादायक आहे. या दोन्ही खेळाडूंसाठी पुनरागमन करणे सोपे नसेल. त्यांच्या जागी निवड झालेल्यापैकी अंबाती रायडूने पुनरागमन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो भारतीय संघात नव्हता. पण आता त्याची एकदिवसीय संघात निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि विशेषत: आयपीएलमध्ये त्याने लक्ष वेधले आहे. दुसरा खेळाडू म्हणजे सिद्धार्थ कौल. त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. यंदा त्यानेही आयपीएलमध्ये छापपाडली आहे. विशेष म्हणजे रायडू तिशीच्या पलीकडे असून कौलही तिशीच्या आसपास आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी वयाकडे न पाहता कामगिरीला प्राधान्य देत दोघांचा विचार केला आहे. माझ्या मते हा खूप चांगला विचार आहे.त्याचबरोबर १९ वर्षांखालील विश्वचषक विजेते खेळाडू शुभमान गिल, पृथ्वी शॉ, शिवम मावी यांची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अद्याप निवड झाली नाही, कारण त्यांना आधी ‘अ’ संघात खेळविण्याचा विचार झालेला आहे.आयपीएल आता रोमांचक स्थितीत आली आहे. राजस्थान रॉयल्स - किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिथे पंजाबच्या विजयाची अपेक्षा होती तिथे राजस्थानने बाजी मारली. या विजयासह राजस्थानच्या प्ले आॅफच्या आशा कायम राहिल्या आहेत. पण पंजाब मात्र थोडा बॅकफूटवर गेला आहे.हैदराबाद अव्व्ल स्थानी असून त्यानंतर अनुक्रमे चेन्नई, पंजाब आणि केकेआर आहेत. आता पुढचे सर्व सामने महत्त्वाचे आहेत. मुंबई, दिल्ली, राजस्थान यांना सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे आहे; आणि हे संघ सर्व सामने जिंकले तर पंजाब, कोलकाता यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे आॅरेंज कॅप व पर्पल कॅपवर नजर टाकल्यास पंजाबचे वर्चस्व दिसेल.लोकेश राहुलकडे आॅरेंज, तर अ‍ॅण्ड्र्यू टायकडे पर्पल कॅप आहे. शिवाय या दोन्ही कॅपसाठीही मोठी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे यामध्येही सातत्याने बदल दिसून येतील. प्ले आॅफचा विचार करता माझ्या मते हैदराबादचे स्थान निश्चित आहे. चेन्नईचेही स्थान थोड्या प्रमाणात गृहीत धरता येईल. पण केकेआर आणि पंजाब हे दोन्ही संघ काठावर आहेत. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सर्वांत रोमांचक क्षण आलेला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेटबातम्या