मुंबई : आयपीएलच्या आगामी सत्राआधी १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत एकूण ३५० खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यामध्ये २४० भारतीय, तर ११० विदेशी क्रिकेटपटू आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेत पुनरागमन करणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डिकॉक याचाही अंतिम यादीत समावेश झाला आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही या लिलावात समावेश असून, तो २ कोटी रुपये या मूळ किमतीसह सहभागी होईल. याआधी स्मिथ २०२१ मध्ये आयपीएलमध्ये अखेरचा सामना खेळला होता.
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, या लिलावासाठी सुरुवातीला १ हजार ३९० खेळाडूंनी नोंदणी केली होती. ही संख्या पुढे १ हजार ५ पर्यंत कमी करण्यात आली. त्यातून अंतिम ३५० खेळाडूंची निवड झाली. दहा फ्रँचायझी संघ या खेळाडूंमधून उर्वरित ७७ जागा भरतील. खेळाडूंच्या पहिल्या सेटमध्ये पृथ्वी शाॅ आणि सरफराज खान यांचा समावेश आहे. दोघांचीही मूळ किंमत ७५ लाख रुपये अशी आहे.
पृथ्वी २०१८ ते २०२४ दरम्यान आयपीएलमध्ये खेळला. मात्र, मागील लिलावात त्याला कोणतीही बोली मिळाली नव्हती. सरफराज २०२१ नंतर आयपीएलमध्ये खेळलेला नाही. व्यंकटेश अय्यरही २ कोटी मूळ किमतीसह लिलावात सहभागी होईल. त्याचप्रमाणे विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, न्यूझीलंडचा डीवॉन कॉन्वे, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर यांचाही समावेश आहे. यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.
कोलकाताकडे सर्वाधिक रक्कम
तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या कोलकाताकडे या लिलावासाठी सर्वाधिक ६४.३ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध आहे. त्यानंतर चेन्नई ४३.४ कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादकडे २५.५ कोटींची रक्कम आहे.
इंग्लंडचे सर्वाधिक खेळाडू
या लिलाव प्रक्रियेसाठी निवड झालेल्या अंतिम खेळाडूंमध्ये इंग्लंडचे २१ खेळाडू आहेत. यामध्ये यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथ, गस ॲटकिन्सन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कसोटी सलामीवीर बेन डकेट यांचाही समावेश आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनवर मोठी बोली लागण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण १९ खेळाडू यादीत आहेत. यामध्ये जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, कूपर काॅनोली आणि ब्यू वेबस्टर यांची नावेही आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंचा या लिलावात समावेश असून, एन्रिच नाॅर्खिया, लुंगी एनगिडी, गेराल्ड कोएट्जी आणि वियान मुल्डर यांच्यावर लक्ष असेल. वेस्ट इंडिजचे ९ खेळाडू लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. यामध्ये अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, एकीम ऑगस्टे, शाय होप आणि रोस्टन चेस यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, श्रीलंकेचे १२, न्यूझीलंडचे १६ आणि अफगाणिस्तानच्या १० खेळाडूंचा यादीत समावेश आहे.