ठळक मुद्देलोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा रंगणार आहे. विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या या जोडीने लग्नासाठी पर्यावरण अनुकूल इको फ्रेंडली थीम ठेवली आहे.
मुंबई - इटलीत 11 डिसेंबरला खासगी सोहळयामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली विवाहबद्ध झाले. या लग्नाला ज्यांना हजर राहता आले नाही त्यांच्यासाठी आज मुंबईमध्ये दुसरा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये झालेल्या विवाहसोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रिसेप्शनच्या एकदिवस आधी विराट आणि अनुष्काने मोदींची भेट घेऊन रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते.
टायमिंग - रात्री 8.30 वाजता रिसेप्शन सोहळयाला सुरुवात होईल. 21 डिसेंबरला दिल्लीतही याच वेळेला रिसेप्शन सोहळा सुरु झाला होता.
कुठे - इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा रंगणार आहे. या हॉटेलचा बॉलरुम ऐसपैस असून तिथे एकाचवेळी 300 पाहुण्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे.
निमंत्रण - चाहत्यांमध्ये विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या या जोडीने लग्नासाठी पर्यावरण अनुकूल इको फ्रेंडली थीम ठेवली आहे. विराट आणि अनुष्काने पर्यावरण अनुकूल लग्न पत्रिका बनवल्या आहेत. लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेवर झाडाची पाने आहेत.
पाहुण्यांची यादी - रिसेप्शन मुंबईत असल्याने अनुष्का शर्माचे बॉलिवूड कनेक्शन लक्षात घेता बॉलिवूडमधील बडे चेहरे या सोहळयाला हजेरी लावतील अशी शक्यता आहे. महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, झहीर खान, विरेंद्र सेहवाग, बीसीसीआय पदाधिकारी या रिसेप्शनला उपस्थिती लावतील. आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्थान चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने तो अनुपस्थित राहू शकतो. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार मुकेश अंबानी, नीता अंबानी सुद्धा या सोहळयाला हजेरी लावतील.
संपूर्ण भारतीय संघही या रिसेप्शन सोहळयाला उपस्थित असेल. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी उद्या 27 डिसेंबरला मुंबईहून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला प्रयाण करेल.
विराट हा मुळचा दिल्लीचा असल्यामुळे त्याच्या पहिल्या रिसेप्शन सोहळ्यात मित्रमंडळींनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. तसेच, विराट आणि अनुष्काच्या कुटुंबातले सर्व नातेवाईकही हजर होते. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यान विराट आणि अनुष्काने पारंपरिक पोशाख केला होता. विराटने ब्लॅक शेरवानी घातली होती, तर अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली होती.