Join us  

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं 13 वर्षांनंतर झळकावलं शतक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेन याने 13 वर्षांपूर्वीचा शतकाचा दुष्काळ संपवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:35 AM

Open in App

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेन याने 13 वर्षांपूर्वीचा शतकाचा दुष्काळ संपवला. यष्टिरक्षक फलंदाज टीम पेननं शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत तस्मानिया संघाचे प्रतिनिधित्व करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध 121 धावांची खेळी केली. 124 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा टीम पेननं शतकी पल्ला पार केला आहे. 34 वर्षीय पेननं 2006मध्ये प्युरा चषक स्पर्धेत 215 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पेनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते. 

तस्मानिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पेन सातव्य क्रमांकाला फलंदाजीला आला. झाय रिचर्डसन आणि मिचेल मार्श या खमक्या गोलंदाजांचा सामना करताना त्यानं दमदार फलंदाजी केली. पेननं कॅबेल जेवेलसोबत 80 धावांची भागीदारी केली. पेनच्या फटकेबाजीच्या जोरावर तस्मानिया संघाने पहिल्या डावात 397 धावा केल्या आणि 60 धावांची आघाडी  घेतली. 

नुकत्याच पार पडलेल्या अॅशेस मालिकेत पेनला 180 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. आजच्या खेळीनं त्याचा आत्मविश्वास उंचावण्यात मदत मिळाली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 148 धावा केल्या आहेत.  

टॅग्स :आॅस्ट्रेलिया