IPL 2020 : राजस्थान रॉयल्स संघातील Jofra Archerची रिक्त जागा भरण्यासाठी तिघं शर्यतीत
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर यानं कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा हा 24 वर्षीय गोलंदाज जूनमध्ये आंतरराष्ट्रीय कमबॅक करणार असे बोलले जात आहे. राजस्थान रॉयल्स संघानं आयपीएलच्या 2018च्या मोसमात जोफ्रासाठी 7.2 कोटी रुपये मोजले. जोफ्रानं आपल्या कामगिरीच्या जोरावर दोन मोसमात 26 विकेट्स घेतल्या.
त्यामुळे जोफ्राचे नसणे राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्काच मानला जात आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स संघानं अजूनही आशा सोडलेल्या नाही. जोफ्राच्या तंदुरुस्तीबाबत ते इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणार आहेत. पण, तोपर्यंत दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं जोफ्राच्या जागी कोणाला अंतिम अकरामध्ये खेळवायचे, याची चाचपणीही सुरू केली आहे. जोफ्राला रिप्लेस करण्यासाठी तीन खेळाडू शर्यतीत आहेत.
डॅनीएल सॅम्स - बिग बॅश लीगच्या 2019-2020च्या मोसमात या खेळाडूनं सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यानं 17 सामन्यांत 30 फलंदाजांना माघारी पाठवले आहे. त्यामागे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस मॉरिसला 22 विकेट्स घेता आल्या आहेत. सॅम्सनं 7.83चा इकोनॉमी रेट कायम राखला आहे आणि बिग बॅश लीगच्या या मोसमात त्यानं निर्धाव षटकं टाकण्यातही बाजी मारली आहे. त्याला फलंदाजीत कमाल दाखवण्याची पुरेशी संधी मिळालेली नाही. पण, लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं दोन अर्धशतकं झळकावली आहेत. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडॉनल्ड बिग बॅश लीगवर लक्ष ठेवून होते आणि ते नक्की जोफ्राच्या जागी सॅम्सचं नाव सुचवतील. 27 वर्षीय सॅम्स आयपीएल 2020 लिलावात अनसोल्ड राहिला होता.
अॅडम झम्पा - आयपीएलच्या एका डावात सहा विकेट्स घेणाऱ्या तीन गोलंदाजांपैकी एक असलेल्या अॅडम झम्पाला 2018च्या आयपीएल लिलावापासून आतापर्यंत एकही फ्रँचायझीनं आपल्या ताफ्यात घेतलेले नाही. आयपीएलमध्ये त्याचे नसणे अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे आहे, परंतु त्याला आता लवकरच बोलावले जाऊ शकते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेत अॅडम झम्पानं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन वेळा बाद केले. भारतीय खेळपट्टीवर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूवर आयपीएल फ्रँचायझींची नजर असते आणि त्यामुळे झम्पाला राजस्थान रॉयल्स घेऊ शकतात. राजस्थान संघात श्रेयस गोपाळ आणि मयांक मार्कंडे हे दोन अनुनभवी फिरकीपटू आहेत. त्यामुळे झम्पासारखा अनुभवी गोलंदाज अंतिम अकरामध्ये असणे संघाच्या फायद्याचे ठरू शकते. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये झम्पानं 143 सामन्यांत 162 विकेट्स घेतल्या आहेत.
कार्लोस ब्रेथवेट - आयपीएलमध्ये दुर्लक्षीत राहिलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून कार्लोस ब्रेथवेटची ओळख करून द्यायला हरकत नाही. त्याला त्याची प्रतीभा सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळालीच नाही. आयपीएल 2020 लिलावात त्याच्यावर बोली लावण्यास कोणीच उत्सुक दिसले नाही. बेन स्टोक्ससारखाच तोही परफेक्ट ऑलराऊंडर आहे. तो स्टोक्सपेक्षा अधिक उत्तुंग षटकार टोलवू शकतो आणि डेथ ओव्हरमध्ये महत्त्वाची विकेटही घेऊ शकतो. वेस्ट इंडिज संघासाठी त्यानं अनेकदा असं करून दाखवलं आहे. 2016च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ( तेव्हाची दिल्ली डेअरडेव्हिल्स) त्याला 4.2 कोटीत घेतले. 2018मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादनं 2 कोटीत आपल्या ताफ्यात घेतले. 2019मध्ये कोलाकाता नाइट रायडर्सनं त्याच्यासाठी 5 कोटी मोजले, परंतु त्याला केवळ दोनच सामने खेळवले. ब्रेथवेटला घेण्यासाठी आता राजस्थान रॉयल्सला केवळ 50 लाख मोजावे लागतील.