सिडनी : मार्नस लाबुशेन याने १४ व्या कसोटीत झळकावलेल्या चौथ्या शतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध शानदार सुरुवात करीत ३ बाद २८३ धावा उभारल्या. लाबुशेनने न्यूझीलंडविरुद्ध दुसरे कसोटी शतक झळकवले. तिसºया स्थानावर आलेल्या लाबुशेन (१३०*) आणि मॅथ्यू वेड (२२*) पहिल्या दिवसअखेर नाबाद आहेत.
स्टीव्ह स्मिथ यानेही २६ वे अर्धशतक साजरे केले. डेव्हिड वॉर्नर ४५ धावा काढून उपहारानंतर तिसºया चेंडूवर बाद झाला. नील वॅगनर याने चौथ्यांदा वॉर्नरला बाद केले. पाकविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात नाबाद ३३५ आणि १५१ धावा ठोकणाºया वॉर्नरला न्यूझीलंडविरुद्ध मात्र एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. सलामीचा फलंदाज ज्यो बर्न्स १८ धावांवर बाद झाला.
याआधी यजमान आॅस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबोर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीत २४७ धावांनी पराभूत झालेल्या न्यूझीलंडने संघात पाच बदल केले. कर्णधार केन विलियम्सन आजारी असल्याने टॉम लॉथम संघाचे नेतृत्व करीत आहे.
फलंदाज हेन्री निकोल्स, फिरकीपटू मिशेल सँटनर हे देखील आजारी आहेत. त्याचवेळी टिम साऊदीऐवजी लेग स्पिनर टॉट एसेल याला संधी देण्यात आली. प्रमुख वेगवान गोलनदाज ट्रेंट बोल्ट दुखापतीमुळे बाहेर बसला असल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. फलंदाज ग्लेन फिलिप्सला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. विल समरविले, मॅट हेन्री आणि जीत रावल यांनादेखील अंतिम संघात संधी देण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)