Join us

तिसरी कसोटी : संघात शार्दुल की नवदीप ?

सलामीला रोहित शर्मा घेणार मयांक अग्रवालचे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:44 IST

Open in App

सिडनी : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी मैदानात येईल तेव्हा सलामीवीर म्हणून रोहित शर्मा मयांक अग्रवाल याचे स्थान घेण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी तिसरा गोलंदाज कोण ह संघ व्यवस्थापनापुढे प्रश्न आहे. शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यापैकी एकाची वर्णी लागू शकते.अग्रवाल हा मागच्या आठपैकी सात डावांत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संघ व्यवस्थापन रोहितला प्राधान्य देईल, यात शंका नाही. 

दुसरीकडे तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर की नवदीप सैनी यावर एकमत झालेले नाही. मागच्या काही दिवसांआधीपर्यंत मुंबईचा वेगवान गोलंदाज आणि तळाच्या स्थानावरील उपयुक्त फलंदाज शार्दुल ठाकूर हा पहिली पसंती मानला जात होता. तथापि, संघातील काही वरिष्ठ खेळाडूंच्या मते, भारताचा सर्वांत वेगवान गोलंदाज सैनी हा आपल्या चेंडूंमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्रस्त करू शकतो. चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यामुळे नवदीपला पसंती मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

तिसऱ्या गोलंदाजाचा निर्णय लांबलाn तिसरा गोलंदाज निवडण्यास विलंब होत आहे. मंगळवारी सिडनीत हवामान खराब होते. त्यामुळे मुख्य खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली. बुधवारी खेळपट्टी आणि परिस्थितीचे आकलन केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आकाश ढगाळ असेल आणि खेळपट्टी दमट असल्यास शार्दुलच्या निवडीची शक्यता आहे. खेळपट्टी पाटा असल्यास नवदीपला संधी दिली जाऊ शकते. तो वेगवान चेंडू टाकण्यासह जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात तरबेज मानला जातो. अशावेळी सैनीचे कसोटी पदार्पण होऊ शकते. शार्दुलची अंतिम ११ खेळाडूंत निवड झाल्यास त्याच्यासाठीही देखील पर्दापणासारखेच ठरेल. दोन वर्षाआधी अधिकृतरीत्या त्याने पदार्पण केले तेव्हा स्वत:चे पहिले षटक पूर्ण करण्याआधीच शार्दुल जखमी झाला होता.वेगवान माऱ्यासाठी भारताकडे टी. नटराजन याच्या रूपाने आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. डावखुऱ्या या गोलंदाजाने मागील चार महिन्यांत शानदार कामगिरी केली. सोमवारी त्याने कसोटी संघाच्या टी शर्टमधील स्वत:चे फोटो देखील ट्विट केले होते. नटराजन याला प्रथम श्रेणीच्या २० सामन्यांचा अनुभव आहे. रणजी करंडकात मागच्यावर्षी जानेवारीत स्वत: अखेरचा सामना खेळला होता.

रोहितवर खिळल्या नजराभारतीय खेळाडूंनी सिडनीत सकाळी नेटमध्ये सराव केला.यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या रोहित शर्मावर.रोहित वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे सहज खेळताना दिसला.

तिसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर/ नवदीप सैनी.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया