पुणे : भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे मुख्य गोलंदाज संघात परतल्याने भारताची गोलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. यामुळे पुण्यात शनिवारी होणाऱ्या मालिकेतील तिसºया सामन्यात विजय मिळवून २-०ने आघाडी घेण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर शनिवारी हा दिवस-रात्रीचा सामना रंगणार आहे.
पुण्यात उभय संघांत होणारा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर मालिकेतील पहिला सामना भारताने सहजपणे जिंकला होता. दुसºया सामन्यातही विराटने शतकी तडाखा दिला. मात्र, यष्टिरक्षक-फलंदाज शाय होपचे नाबाद आणि शिमरॉन हेटमायरच्या आक्रमक ९४ धावा यामुळे पाहुण्या विंडीजने दुसरी लढत अखेरच्या चेंडूवर टाय केली. अर्थात, भुवी आणि जसप्रीत हे आघाडीचे गोलंदाज संघात नसल्याचा फटका भारताला बसला. या दोन्ही सामन्यांत अननुभवी फलंदाजांचा भरणा असलेल्या विंडीज संघाने सव्वातीनशेच्या घरात मजल मारली होती. विशेषत: पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली. आता भुवी-बुमराह जोडी संघात परतल्याने फलंदाजांप्रमाणे भारताचे गोलंदाजही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविण्यास सज्ज झाले आहेत.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वांत वेगाने १० हजार धावा करण्याचा विक्रम विराटने मागील लढतीतच आपल्या नावे केला. मालिकेत सलग २ शतके झळकावत त्याने आतापर्यंत २९७ धावा फटकावल्या आहेत. शनिवारी तो काय करामत करतो, याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा नक्कीच असतील.
पुढील वर्षी मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा होत असून त्यापूर्वी भारताला केवळ १६ सामने खेळायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने विचार केल्यास मध्यफळी आणि तळातील फलंदाजी यांच्यात सातत्याचा अभाव ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ही समस्या सोडविण्याचे आव्हान विराटसमोर आहे. यादृष्टीने विश्वचषकापर्यंतची प्रत्येक लढत भारतासाठी महत्त्वाची आहे. दुसºया सामन्यात अंबाती रायुडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७३ धावांची शानदार खेळी केली होती. यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर तो किती उपयुक्त ठरतो, हे येत्या काही सामन्यांत कळेल.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुसºया सामन्यात प्रभावी ठरू शकला नाही. त्याने २५ चेंडूंत २० धावा केल्या. संभाव्य विश्वचषक संघात धोनीची निवड जवळपास निश्चित असली तरी उद्याच्या सामन्यासह आगामी काळात फलंदाजीत स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव त्याच्यावर नक्कीच असेल. युवा ऋषभ पंत याने कसोटी मालिकेत चमक दाखविली होती. एकदिवसीय प्रकारातही त्याच्याकडून अपेक्षा आहेत.
विंडीजचा विचार करता युवा फलंदाज हेटमायर हा मालिकेतील ‘फाइंड’ ठरला आहे. या मालिकेपूर्वी १२ सामन्यांत एका शतकासह ४७९ धावा करणाºया हेटमायरने गत २ सामन्यांत अनुक्रमे १०४ व ९६ धावा फटकावल्या आहेत. हेटमायरला रोखले नाही तर तो भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. शाय होपसह किरॉन पॉवेल, चंदरपॉल हेमराज व रोवमॅन पॉवेल यांच्याकडून विंडीजला अपेक्षा आहे. कर्णधार जेसन होल्डर व मार्लन सॅम्युअल्स या अनुभवी जोडीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. केमार रोच व देवेंद्र बिशू हे गोलंदाज महागडे ठरले.
>प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, मनिष पांडे, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शलील अहमद, उमेश यादव आणि के.एल. राहुल.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅ बियन अॅलन, सुनील अंबारीश, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, एविन लुईस, अॅशले नर्स, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मर्लान सॅम्युअल्स आणि ओशेन थॉमस.