कोलकाता- भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा कसोटी सामन्यात सर्व पाचही दिवस फलंदाजी करणारा तिसरा भारतीय व जगातील नववा फलंदाज ठरला आहे. पुजारा सोमवारी श्रीलंकेविरुद्ध पाचव्या व अखेरच्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्या वेळी त्याने एम. एल. जयसिम्हा व रवी शास्त्री यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला. या तिन्ही फलंदाजांनी हा पराक्रम ईडनगार्डन्सवरच नोंदविला, हे विशेष.
पुजाराने या कसोटीत ७४ (५२ व २२ धावा) धावा केल्या. पाच दिवस फलंदाजी करणाºया फलंदाजांमध्ये या सर्वांत कमी धावा आहेत. जयसिम्हाने १९६० मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद २० व ७४ धावा केल्या होत्या. शास्त्रीने १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध १११ व नाबाद ७ धावा केल्या होत्या.
याव्यतिरिक्त जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड), किम ह्युजेस (आॅस्ट्रेलिया), अॅलन लँब (इंग्लंड), अॅड्रियन ग्रिफीथ (वेस्ट इंडिज), अँड्य्रू फ्लिन्टॉफ (इंग्लंड), अल्विरो पीटरसन (द. आफ्रिका) यांनी हा पराक्रम केला आहे.
>माझ्यासाठी ५० शतकांचा
प्रवास फार मोठा नव्हता : कोहली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकांचा प्रवास माझ्यासाठी फार मोठा नव्हता. हा आकडा दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रवास मात्र अपेक्षेच्या तुलनेत मोठा नव्हता, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहलीने आज कसोटी कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकांचा पल्ला गाठला. कोहली म्हणाला, ‘मी शतकांच्या संख्येचा विचार करण्यापेक्षा कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो. माझ्यासाठी हा प्रवास प्रदीर्घ नव्हता. कामगिरीत सुधारणा केल्यानंतर आनंद मिळतो.’
ज्या वेळी मी खेळण्यास सुरुवात केली त्या वेळी मी केवळ स्विंगवर अवलंबून होतो, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप सोडण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक आहे. मी स्वत:च्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली असून त्याचा लाभ होत आहे. दुसºया डावात गोलंदाजी करणे अधिक कठीण होते. - भुवनेश्वर
अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची ठरते. आम्ही चांगली लढत दिली. अखेरच्या सत्रापूर्वीपर्यंत आम्ही चांगली कामगिरी केली. अखेरच्या १०-१५ षटकांमध्ये आम्ही दडपणाखाली आलो होतो, पण आम्ही चांगला खेळ केला. दुसºया डावात प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देण्याची कला शिकावी लागेल.
- दिनेश चंडीमल
>...तर आम्ही जिंकू शकलो असतो : राहुल
आणखी पाच-सहा षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर श्रीलंकेविरुद्ध सोमवारी अनिर्णीत संपलेल्या लढतीत भारताला विजय मिळवता आला असता, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केली. राहुल म्हणाला, ‘अशा प्रकारच्या लढतीची अपेक्षा करायला हवी. जर पाच-सहा षटके असती तर विजय मिळवू शकलो असतो. आमच्यासाठी हा चांगला अनुभव होता. पावसाच्या व्यत्ययामुळे बराच वेळ वाया गेला असला तरी लढतीमध्ये चुरस अनुभवायला मिळाली. चांगल्या खेळपट्टीवर पूर्ण पाच दिवस खेळ न झाल्याचे शल्य आहे. सर्व वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळाली.