अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
पुढील शनिवारी १९वी आयपीएल सुरू होत आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर अनेक स्टार खेळाडू यंदाच्या मोसमात सहभागी होत आहेत. या स्पर्धेत कोणत्या खेळाडूंवर चाहते, फ्रँचायझी, तज्ज्ञांची नजर असेल याचा विचार केला तर मी पुढील काही खेळाडूंचे विश्लेषण करेन.
रोहित शर्मा, विराट कोहली : हे दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेट खेळत नाहीत. कसोटीही खेळत नाहीत; पण आयपीएल खेळतात. २०२७च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची दोघांची इच्छा आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांची तंदुरुस्ती, कामगिरी कशी असेल यात प्रत्येकाला रस आहे. त्यांचे वय पाहता तंदुरुस्ती, फाॅर्म या दोन्हींबाबत अनिश्चितता असते. त्यामुळे दोघांनाही सातत्याने स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
संजू सॅमसन : संजू राजस्थान संघाचा कर्णधार होता. आता तो चेन्नईकडून खेळणार आहे. संजूच्या संघ बदलावर बरीच चर्चा झाली. आता टी-२० विश्वचषकात केलेल्या कामगिरीमुळे संजूवर विशेष लक्ष असेल. चेन्नईचा संघ सुपरस्टार खेळाडूला आणखी मोठे करण्यासाठी ओळखला जातो. महेंद्रसिंग धोनी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता संजू सॅमसन चेन्नईकडून कशी कामगिरी करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे.
शुभमन गिल, ऋषभ पंत : शुभमन गुजरात संघाचा कर्णधार आहे. तर ऋषभ लखनौचा कर्णधार आहे. दोघेही एकाच वयोगटातील आहेत. ऋषभ दुखापतीमुळे कसोटी संघातही खेळत नाही. शुभमन कसोटी संघाचा कर्णधार आहे. पण टी-२० संघात त्याने स्थान मिळवलेले नाही. याच वयोगटातील इशान किशन, अभिषेक शर्मा यांनी या दोघांची जागा घेतली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे शुभमन आणि ऋषभ कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे : १९ वर्षांखालील विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये वैभव राजस्थानकडून तर आयुष चेन्नईकडून खेळतो. वय कमी असल्यामुळे हे दोघे कामगिरीत कशी सुधारणा करतात याची सर्वांनाच उत्सुकता असेल. एक आयपीएल गाजवल्यानंतर पुढील स्पर्धेत तुम्ही फाॅर्म कायम राखता का हे पाहावे लागेल.
कॅमेरून ग्रीन : आयपीएलच्या मागील लिलावात सर्वाधिक किंमत मिळालेला खेळाडू. कोलकाताने २५.२० कोटी रुपये मोजून या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले.
विदेशी खेळाडू : चांगली रक्कम मिळूनही काही विदेशी खेळाडू सुरुवातीचे सात-आठ सामने खेळू शकणार नाहीत, यावरून बरीच टीकाही झाली. मिचेल स्टार्क (दिल्ली), जोश हेझलवूड (बंगळुरू), लाॅकी फर्ग्युसन (पंजाब), पॅट कमिन्स (हैदराबाद) हे खेळाडू संघात आहेत पण ते उपलब्ध नाहीत.