हे आहेत सर्वात 'वजनदार' क्रिकेटपटू

सर डब्ल्यू. जी ग्रेस ते राहकीम कॉर्नवॉल असा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:13 PM2019-08-11T14:13:47+5:302019-08-11T14:14:09+5:30

whatsapp join usJoin us
These are the most 'weighty' cricketers | हे आहेत सर्वात 'वजनदार' क्रिकेटपटू

हे आहेत सर्वात 'वजनदार' क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे 

तब्बल 140 किलो वजन आणि साडे सहा फूट उंची...अशी व्यक्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण वेस्ट इंडिजचा फिरकीपटू राहकीम कॉर्नवॉलने हा समज खोटा ठरवला आहे. भारताविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याची वेस्ट इंडिज संघात निवड करण्यात आली आहे आणि 22 ऑगस्टला त्याने कसोटी पदार्पण साजरे केले तर कसोटी क्रिकेट खेळणारा तो सर्वात वजनदार क्रिकेटपटू ठरेल. 

दिवंगत ऑस्ट्रेलियन कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्राँग  यांच्यानंतर प्रथमच कसोटी क्रिकेटला एवढा वजनदार खेळाडू लाभलाय. आर्मस्ट्राँग यांचे वजन 133 किलो होते.  वन डे इंटरनॅशनल  सामन्यांसाठी हा विक्रम बर्म्युडाच्या ड्वेन लेव्हरॉकच्या नावावर आहे. लेव्हरॉकचे वजन 127 किलो होते. क्रिकेटला सर डब्ल्यु. जी. ग्रेस यांच्यापासून ते आता राहकीमपर्यंत वजनदार पण तेवढ्याच यशस्वी क्रिकेटपटूंचा इतिहास आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वजनदार खेळाडू

१) राहकीम कॉर्नवॉल (वेस्ट इंडिज- 140 किलो) 

ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडू. 55 प्रथम श्रेणी सामन्यात त्याच्या नावावर 2224 धावा असुन 260 विकेटही त्याने काढल्या आहेत. गोलंदाजीत त्याची सरासरी 23.60.अशी प्रभावी आहे. लीवर्ड आयलंडच्या संघाचे त्याने नेतृत्वही केले आहे. असा हा खेळाडू आता कसोटी क्रिकेटच्या उंबरठ्यावर आहे. 

2) वॉर्विक आर्मस्ट्राँग (ऑस्ट्रेलिया-  133 किलो)

राहकीमच्या आधीचा सर्वात वजनदार आणि यशस्वी क्रिकेटपटू. त्यांचा आकार बघून त्यांना 'बिग शीप' (विशाल जहाज) सुध्दा म्हटले जायचे. ऑस्ट्रेलियाचे सफल नेतृत्व केलेला हा वजनदार खेळाडू क्रिकेटच नाही तर फूटबॉल सुध्दा खेळायचा हे आणखी एक आश्चर्य! आर्मस्ट्राँग हे फलंदाज म्हणून ओळखले जात असले तरी ते लेगस्पिन गोलंदाजीसुध्दा करायचे. त्यांच्या नावावर 1902 ते 1921या काळात 50 कसोटी सामन्यांमध्ये सहा शतकांसह 2863 धावा आहेत आणि 87 बळी व 44 झेल आहेत. 

3) ड्वेन लेव्हरॉक (बर्म्युडा-  127 किलो)

लेव्हरॉकचे नाव घेतले की आपले अवजड शरीर असतानाही 2007 च्या विश्वचषक सामन्यात त्याने विलक्षण चपळाईने घेतलेला रॉबीन उथप्पाचा झेल आठवतो. बर्म्युडाचा हा पोलीस होता प्रतिभावान पण दुर्देवाने बर्म्युडाचा संघच प्रगती करु शकला नाही त्यामुळे अगदी मोजक्याच सामन्यांपुरती त्याची कारकिर्द मर्यादीत राहिली. 

4) रिची काशूला (झिम्बाब्वे - 126 किलो) 

1970 व 1980 च्या काळातील झिम्बाब्वेचा (त्यावेळचे ऱ्होडेशिया) हा क्रिकेटपटू. गोलंदाजीत त्याने चांगले नाव कमावले होते. पुढे निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

5) कॉलिन मिलबर्न (इंग्लंड- 121 किलो)

सर्वात वजनदार क्रिकेटपटूंचा विषय येतो तेंव्हा क्रिकेटच्या जाणकारांना सर्वात आधी हे नाव आठवते. 1966 ते 69 दरम्यान मिलबर्न फक्त 9 कसोटी सामने खेळले. ते आणखीही बरेच सामने खेळले असते पण एका अपघातात डाव्या डोळ्याची दृष्टी गमावल्याने त्यांचे सामने मर्यादीत राहिले. 

6) इंझमाम उल हक (पाकिस्तान- 103 किलो)

आपल्या भारीभक्कम शरीरामुळे 'पोटॅटो' असे चिडवला गेलेला आणि त्यामुळे प्रेक्षकाच्या अंगावर धावून गेलेला हा पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सफल फलंदाज. तब्बल 40 वेळा धावबाद होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कारण सांगण्याची गरज नाही. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेआधी त्याने आपले वजन 10 किलोने घटवले होते. पण शंभराच्या वर वजन असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप यशस्वी होता येते हे त्याने दाखवून दिले होते.

या क्विंटलभर वजनाच्या खेळाडूंशिवाय न्यूझीलंडचा जेस्सी रायडर, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा, ऑस्ट्रेलियाचा मार्क कॉसग्रोव्ह, इंग्लंडचा समीत पटेल, क्रिकेटचे पितामह सर डब्ल्यु. जी. ग्रेस यांची वजनदार खेळाडूंमध्ये गणना करता येईल असे हे खेळाडू होते.

Web Title: These are the most 'weighty' cricketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.