सनरायझर्स हैदराबादकडून लाजीरवाण्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला झापताना सर्वांनी पाहिले. त्यांची ही कृती कोणालाच आवडली नाही आणि नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. गोएंका यांच्या या वागण्यावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने तिखट वार केला आहे. वीरूने म्हटले की, तुम्हाला ४०० कोटींचा फायदा होत आहे. तुमचे काम फक्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे असले पाहिजे.
लखनौ सुपर जायंट्सने प्ले ऑफसाठी महत्त्वाच्या लढतीत १६५ धावा केल्या होत्या. पण, अभिषेक शर्मा ( ७५) व ट्रॅव्हिस हेड ( ८९) यांनी ९.४ षटकांत फलकावर विजयी १६७ धावा चढवून सनरायझर्स हैदराबादला विक्रमी १० विकेट्सने विजय मिळवून दिला. संघाच्या कामगिरीवर नाखूश गोएंका यांनी लोकेश राहुलवर संताप व्यक्त केला होता. त्यावर वीरेंद्र सेहवाग क्रिकबझवर बोलताना म्हणाला, “खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये भेटणे आणि त्यांना प्रेरित करणे ही मालकाची भूमिका असते. काय होत आहे? काय प्रॉब्लेम आहे ? व्यवस्थापनात काय चालले आहे? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी खेळाडूंकडून जाणून घ्यायला हवी. मला वाटतं की मालकांनी असे वागू नये.”
सेहवाग पुढे म्हणाला, “इतर उद्योगपतीही आहेत. ते नफा-तोट्याचा विचार करतात. पण इथे तुमचे नुकसान होत नाही. तुम्हाला ४०० कोटींहून अधिक नफा मिळत आहे. क्रिकेट हा एक असा व्यवसाय आहे जिथे आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही, असा माझा विश्वास आहे. तुम्हाला नफाही मिळत आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहित करणे हे तुमचे काम आहे. जर एखादा खेळाडू आयपीएलमध्ये आपल्याकडे बऱ्याच फ्रँचायझींचा पर्याय आहे, असा विचारग करू लागल्यास काय होईल? तुम्ही कोणत्याही खेळाडूला गमावल्यास, तुमची जिंकण्याची शक्यताही शून्य होईल.”
मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
शमी म्हणाला की, खेळाडूंना आदर देणे गरजेचे असते. त्यांनी राहुलला थोडी तरी रिस्पेक्ट द्यायला हवी होती... ते संघमालक असताना असे वागतात हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला कोट्यवधी लोक पाहत आहेत, यातून काहीतरी शिकत आहेत. जर अशा गोष्टी खुलेआम होत असतील तर मला वाटते की त्यांना लाज वाटायला हवी. हे असे व्हायला नको हवे होते. जर तुम्हाला याबद्दल चर्चा करायची असेल तर यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत. ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली जाऊ शकते. शमी 'क्रिकबज'च्या एका कार्यक्रमात बोलत होता.