वेलिंग्टन : न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आज आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या आयोजनाच्या निर्णयाची पाठराखण करताना क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांनी टी-२० सामन्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हेसन बोलत होते.
हेसन यांनी खेळाडू व सपोर्ट स्टाफवर प्रदीर्घ कालावधीच्या दौºयाचा होणाºया प्रभावाचा विचार करताना बेलिस यांची चिंता योग्य असल्याचे हेसन म्हणाले. पण, क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी टी-२०ची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
हेसन यांनी याविषयी पुढे म्हटले की, ‘काही देशांसाठी हे प्रकरण खूप मोठे नसेल. परंतु, न्यूझीलंड क्रिकेटसाठी इडन पार्क येथे ३५ हजार लोकांचे येणं आमच्यासाठी, खेळासाठी आणि खेळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे.’
त्याचवेळी, प्रशिक्षक हेसन यांनी टी२० क्रिकेटचे आयोजन निरुपयोगी असल्याच्या मताचेही खंडन केले. याविषयी हेसन यांनी सांगितले की, ‘क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू आहेत जे केवळ टी२० क्रिकेट सामने खेळतात. परंतु या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळते. त्यामुळे माझ्या मते टी२० क्रिकेटचे आयोजन पूर्णपणे योग्य असून यामुळे खेळाडूंचे नुकसान होत नाही.’ (वृत्तसंस्था)