Join us  

श्रीलंकेविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत स्पर्धाच दिसत नाही

श्रीलंकेविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आणि एकतर्फी आघाडी घेतली आहे. चारही सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले. विशेष म्हणजे या मालिकेत स्पर्धाच दिसत नाहीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:43 AM

Open in App

श्रीलंकेविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आणि एकतर्फी आघाडी घेतली आहे. चारही सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले. विशेष म्हणजे या मालिकेत स्पर्धाच दिसत नाहीए. कारण, श्रीलंकेच्या फलंदाजीत आणि गोलंदाजीत कोणताच दम दिसत नाही. पण तरी भारतीय संघासाठी ही खूप महत्त्वाची मालिका आहे. कारण, केवळ प्रयोग करण्याच्या संधी व्यतिरिक्त दिग्गज खेळाडूंचा फॉर्मही पाहण्याची संधीही भारतीय संघाला मिळत आहे. एकूणच या मालिकेवर लक्ष दिल्यास कळेल की प्रत्येक बाजूने भारतीय संघाला फायदाच झाला आहे. खास करुन सर्वांचे लक्ष महेंद्रसिंग धोनीवर होते. गेल्याच सामन्याद्वारे त्याने आपल्या कारकिर्दीतील ३०० वा एकदिवसीय सामन खेळला. तसेच, त्याने सातत्याने आपला फॉर्म आणि तंदुरुस्ती अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. धोनीने वेगवान आणि चपळतेने फलंदाजी करतानाच यष्टीरक्षणातही नेहमीप्रमाने छाप पाडली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मैदानावरील त्याची उपस्थिती विराट कोहली आणि संघासाठी खूप फायदेशीर ठरत आहे.केवळ, लोकेश राहुलकडून निराशा झाली आहे. अनेक संधी मिळूनही एकदिवसीय मालिकेत त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याव्यतिरिक्त मनिष पांड्ये, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी धावा काढल्या आहेत. गोलंदाजांनीही चमक दाखवली. विशेष कौतुक जसप्रीत बुमराहचे करावे लागेल. त्याने खूपच शानदार गोलंदाजी करताना एक प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडली.दुसरीकडे, क्रिकेटविश्वात खळबळजनक निकालांनी लक्ष वेधले आहे. सर्वप्रथम वेस्ट इंडिजने इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर नमवले. पहिल्या कसोटीत त्यांनी एका दिवसात १९ बळी गमावले होते. त्यामुळे दुसºया कसोटीत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्वचितंच कोणी केली असेल. मात्र, क्रेग ब्रेथवेट व शाई होप या युवा खेळाडूंनी फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला. या शानदार विजयाचा आनंद क्रिकेटविश्वात साजरा होत असतानाच दुसरीकडे, दुबळ्या मानल्या जात असलेल्या बांगलादेशने पहिल्यांदाच बलाढ्य आॅस्टेÑलियाला पराभवाचा धक्का दिला. या अत्यंत अनपेक्षित निकालाने साºया क्रिकेटविश्वाचे लक्ष बांगलादेशने आपल्याकडे वेधून घेतले.शाकिब अल हसनने जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन केले. या निकालाने एक गोष्ट सिध्द झाली की, बांगलादेश घरच्या मैदानावर खूप मजबूत संघ असतो. त्याचबरोबर आपल्या बोर्डसह असलेल्या आर्थिक वादामध्ये जरी विजय मिळवला असला, तरी बांगलादेशविरुद्ध मात्र आॅस्टेÑलियन खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही खूप होत आहे की, इतका मोबदला मिळत असूनही कामगिरी का खालावली? या सर्व घडामोडींकडे बघून मला वाटते की, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे कमजोर मानले जाणारे संघही कसोटी क्रिकेटसाठी खूप फायदेशीर ठरु शकतात आणि या संघामुळेही कसोटी क्रिकेटला मजबूती मिळत आहे.अयाझ मेमन , संपादकीय सल्लागार

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयश्रीलंका