Join us  

... तर निवड समितीला तुमच्या नावाची दखल घ्यावीच लागेल, सांगत आहेत भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर

वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूना आणि त्याच बरोबर त्यांच्या पालकांना कळकळीने सांगितले की, तुम्ही ज्या क्लबसाठी खेळता त्यांच्याशी एकनिष्ठ राहा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 8:46 PM

Open in App

मुंबई : दिलीप वेंगसरकर फौंडेशन आयोजित टोटल कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत भोसले क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी हिंद्कला क्रिकेट क्लबवर १८ धावांनी विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. तीर्थ वनारसे (४९ धावा) हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विजेत्यांना भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी निवडसमितीचे संजय पाटील आणि महाराष्ट राज्याचे क्रीडा संचालक मोटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूना आणि त्याच बरोबर त्यांच्या पालकांना कळकळीने सांगितले की, तुम्ही ज्या क्लबसाठी खेळता त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. कारण हल्ली पालकच मुलांना आज हा क्लब उद्या दुसराच क्लब असे उपद्व्याप करीत असतात. पण तुम्ही जर आपल्या कामगिरीत सातत्य राखलेत आणि आपली कामगिरी उंचावत नेलीत तर निवडसमितीला तुमच्या नावाची दखल घ्यावीच लागेल. त्यामुळे वारंवार क्लब बदलत राहण्यापेक्षा आपली  कामगिरी सुधारण्यासाठी कठोर मेहनत करा असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. मुंबईच्या रणजी निवडसमितीचे सदस्य संजय पाटील यांनी यावेळी बोलताना वेंगसरकर यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. आज भारतात केवळ वेंगसरकर हेच छोट्या खेळाडूंच्या भवितव्यासाठी झटताना दिसत आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तुम्हाला जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा पुरेपूर लाभ उठवून मुंबई आणि पर्यायाने भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी त्याचा वापर करा असे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

तत्पूर्वी भोसले क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना तीर्थ वनारसे (५ चौकारांसह ४९ धावा) आणि आर्य कारले (नाबाद ३१ धावा) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे नर्धारित २१ षटकात ५ बाद १२२ धावांचे लक्ष्य उभारले. या आव्हानाचा पाठलाग करताना या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हिंद्कला स्पोर्ट्स क्लब संघाला ८ बाद १०४ धावांचीच मजल मारता आली. अभिनव शाह २०, दर्शील नकाशे १३ आणि आर्य गायकवाड २० यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना दोन आकडी धावा करण्यात अपयश आले आणि त्यांनी ही लढत १८ धावांनी गमावली. डावखुरा फिरकी गोलंदाज संचित कदम याने २१ धावांत ३ फलंदाजांना बाद करून या यशात सिंहाचा वाटा उचलला. सामन्यातील सर्वोत्तमखेळाडू म्हणून तीर्थ वनारसे याचीच नवड करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक

भोसले क्रिकेट अकादमी – २१ षटकात ५ बाद १२२ (तीर्थ वनारसे ४९, आर्य कारले नाबाद ३१) वि.वि. हिंद्काला क्रिकेट क्लब – २१ षटकात८ बाद १०४ (अभिनव शाह २०, आर्य गायकवाड २०; संचित कदम २१/३). सामनावीर - तीर्थ वनारसे.

टॅग्स :भारतमुंबई