गुवाहाटी : सध्या दमदार फॉर्ममध्ये असलेला यजमान भारतीय संघ आज, मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सलामी सामन्यात खेळेल. घरच्या मैदानाचा फायदा घेत भारतीय संघ ४७वर्षांनंतर पहिले आयसीसी विजेतेपद पटकावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारत सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या वेळेस ही स्पर्धा १२ वर्षांनंतर पुन्हा भारतात खेळवली जात असून, यंदा स्पर्धेत ८ आघाडीच्या संघांचा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. प्रत्येक संघ भारतामधील ४ स्थानांवर आणि कोलंबोमध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने एकूण २८ लीग सामने खेळेल.
सामन्याचे स्थळ : बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार
श्रीलंकेत एकूण ११ राउंड-रॉबिन सामने होतील. यामध्ये पाकिस्तानचे ७लीग सामने आणि भारताविरुद्ध ५ ऑक्टोबरचा सामना होईल. एक उपांत्य लढतही तिथेच होईल. जर पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर हा सामनाही श्रीलंकेतच खेळवला जाईल.
भारताचा दमदार फॉर्म
भारताने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिका जिंकल्या आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारतीयांनी कडवी झुंज दिली. भारताची प्रमुख मदार स्मृती मानधना हिच्यावर असून, तिने यंदा ४ शतके झळकावत ११५.८५च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. सलामीवीर प्रतीका रावल सोबत स्मृतीने आक्रमक सुरुवात करून दिली आहे.
श्रीलंकाही जोर लावणार
सह-आयोजक असलेला श्रीलंका संघ २०२२ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला नव्हता. त्यांच्या आशा २० वर्षाच्या अष्टपैलू ड्यूमी विहांगावर आहेत, जिने तिरंगी मालिकेत ११ बळी घेतले होते.